अ‍ॅपशहर

२८ सप्टेंबर १९६६

Maharashtra Times 28 Sep 2016, 4:00 am
 मुंबईत वादळी तडाखा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28th september 1966
२८ सप्टेंबर १९६६


मुंबई -

आज संध्याकाळी साडेसहाला मुंबई व उपनगर विभागात वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. उपनगरात धुळीचे जोरदार वादळ झाले आणि जोराचा पाऊसही झाला. दक्षिण, मध्य व उत्तर मुंबईत पावसाचा जोर खूप असला तरी वादळ मात्र फार वेगाचे नव्हते. वाऱ्याचा वेग फार नसल्यामुळे झाडे पडली नाहीत किंवा इमारती कोसळल्या नाहीत. हा पाऊस दौंड, औरंगाबाद, कोल्हापूर, मिरज, पुणे, जेऊर, अहमदनगर, गोवा, रत्नागिरी, हर्णे आदी गावात पडला. हस्त नक्षत्राच्या या पावसाने शेतकरी खूष आहेत.

झोपडीवाल्यांचा मोर्चा

मुंबई -

२ ऑक्टोबर रोजी २५ हजार झोपडीवाल्यांचा एक मोर्चा कामगार मैदानापासून निघणार आहे. हा मोर्चा, त्या दिवशी चौपाटीवर काँग्रेस अध्यक्ष कामराज यांची सभा होणार आहे तेथे नेण्यात येईल. ही माहिती झोपडी रहिवासी संग्राम समितीचे तु. कृ. सरमळकर, बाबुराव गुंजरकर यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की निवडणुका पार पडेपर्यंत म्हणजे फेब्रुवारीअखेर एकही झोपडी पाडू नये व झोपड्या पाडण्याचा कार्यक्रम रद्द करावा असे निवेदन आम्ही कामराज यांच्याकडे पाठविले आहे. झोपडीवाले हे मतदार असून झोपड्या पाडल्या तर त्यांची मतदारसंघातून हकालपट्टी होईल व त्यांना आपला मतदानाचा मौल्यवान हक्क गमावून बसावे लागेल.

नोकरवर्ग कराचीत

मुंबई -

गतवर्षीच्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानने जप्त केलेल्या शिंदियाच्या "जलराजेंद्र" व "सरस्वती" या दोन बोटी आणण्यासाठी शिंदियाचा नोकरवर्ग कराचीस रवाना झाला. भारताने जप्त केलेल्या दोन बोटी पाकला परत करावयाचे ठरविले आहे. त्याच्या बदली पाकिस्तान या दोन बोटी भारतास देत आहे.

गुंडगिरीस आळा

हैदराबाद -

बंद किंवा अशा चळवळी करणारे पक्ष आपल्या कामाच्या आड येत असतील किंवा सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करत असतील तर लोकांनी स्वतःहून पुढे येऊन त्यास प्रतिकार केला पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी येथे सांगितले. केरळहून दिल्लीस जात असताना बेगमपेट विमानतळावर श्री. नंदा काही वेळ थांबले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज