अ‍ॅपशहर

३० नोव्हेंबर १९६७

Maharashtra Times 30 Nov 2017, 4:00 am
मंत्रिमंडळ घटनाबाह्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30th november 1967
३० नोव्हेंबर १९६७


कलकत्ता - पश्चिम बंगालमधल्या संयुक्त आघाडीच्या मंत्रिमंडळाची बडतर्फी, डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती व त्यांच्या सल्ल्यानुसार विधीमंडळाची बोलावलेली बैठक या तिन्ही घटना घटनाबाह्य, बेसनदशीर असल्याचा अभिप्राय प्रगट करून सभापती विजयकुमार बानर्जी यांनी त्या रद्द ठरवल्या व विधानसभा बेमुदत तहकूब केल्याचे जाहीर केले. पण सभापतींच्या या निर्णयानंतर राज्यपाल धर्मवीर यांनी विधानसभेचे कामकाज बेमुदत तहकूब ठेवले असल्याचे घोषित करून शह दिला.

दंडवते भाषण

मुंबई - प. बंगालमधील डाव्या आघाडीच्या सरकारच्या लोकशाहीद्रोही पदच्युतीचा शिवाजी पार्कवर भरलेल्या सभेत आज निषेध करण्यात आला. या लोकशाहीवरील अत्याचाराच्या निषेधाची नोंद होत असताना पं. बंगालमधील चीनधार्जिण्या राष्ट्रद्रोही शक्तींचाही निषेध केला पाहिजे, असा आग्रह प्रजा समाजवादी पक्षाचे नेते प्रा. मधु दंडवते यांनी जेव्हा धरला तेव्हा सभेतील काही श्रोत्यांनी निषेधाच्या घोषणा करून त्यांचे भाषण बंद पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बंगालमधील डाव्या सरकारला बडतर्फ करण्याच्या लोकशाहीविरोधी कृत्याचा निषेध करण्यासाठी आज विविध डाव्या पक्षांच्या वतीने जाहीर सभा भरली होती.

ठाकरे यांना अटक

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांना ठाणे पोलिसांनी आज मुंबईत त्यांच्या वांद्रे यथील निवासस्थानी अटक केली. बेकायदा अडवणूक आणि दंगलीस चिथावणी देणे हे त्यांच्यावरील आरोप आहेत. नंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आले. श्री. ठाकरे यांनी ठाणे येथे १२ नोव्हेंबर रोजी केलेल्या भाषणात ठाण्याचे एक नगरपिते मारोतराव शिंदे यांची गाढवावरून धिंड काढण्याची चिथावणी ठाण्यातील नागरिकांना दिली होती असा त्यांचेवर आरोप आहे. त्यातून ही अटक उद्‍भवली आहे.

नागभूमी वाटाघाटीं

नवी दिल्ली - नागभूमी भारतातच राहिली पाहिजे, या मूलतत्त्वावरच भूमिगत नागांशी बोलणी करावयाची भारत सरकारची भूमिका असल्याचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आज लोकसभेत पुनः एकदा स्पष्ट केले. नाग बंडखोरांच्या हालचालीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना गृहमंत्री उत्तर देत होते. नागभूमी भारतापासून फुटून निघण्याच्या प्रश्नांवर चर्चा करायची नाही, याबद्दल दुमत नाही, असे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज