अ‍ॅपशहर

२५ सप्टेंबर १९६८

(२५ सप्टेंबर १९६८च्या अंकातून)...

Maharashtra Times 25 Sep 2018, 10:06 am
संप टळला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 50 years ago
२५ सप्टेंबर १९६८


नवी दिल्ली - देशातील एक लाखावरील गोदी कामगार आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार होते. परंतु कामगारांचे प्रतिनिधी व केंद्र सरकार यांच्या दरम्यान कामगारांच्या मागण्या कोणत्या तत्त्वावर पूर्ण कराव्यात, याबद्दल मतैक्य झाल्याने संकल्पित संप टळला असून संपाची नोटीस मागे घेण्यात आली आहे. केंद्रीय बोट व वाहतूक खात्याचे मंत्री डॉ. व्ही. के. आर. व्ही. राव यांनी आज दुपारी पत्रकारांना मुलाखत देऊन ही माहिती दिली. या प्रसंगी मुंबईचे कामगार नेते मनोहर कोतवाल उपस्थित होते.

‘फ्लू’विना जागा नाही

मुंबई - फ्लूची लागण पोहोचलेली नाही, अशी बृहन्मुंबईतील एखादी चाळ अथवा आलिशान बंगला सापडल्यास त्या इमारतीस खास बक्षीस दिले पाहिजे. परंतु, अशी एकही इमारत सापडणे शक्य नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात ही साथ पसरली आहे. सिंगापूर मद्रासमार्गे मुंबईत येऊन थडकलेल्या सौम्य स्वरूपाच्या या फ्लू मुळे हजारो नागरिक आजारी झाले आहेत. खाजगी दवाखान्यातून औषधे घेणाऱ्या रुग्णापैकी ८० टक्के सध्या फ्लू मुळे आजारी असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. डी. व्ही. परुळेकर यांनी आज वार्ताहरांना सांगितले.

चीनमध्ये बेसुमार आत्महत्या

तैपेह - चीनमध्ये आत्महत्या करणाऱ्या लोकांचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत अतिशय वाढले आहे, असे तैपेह येथे येणाऱ्या लाल रक्षकांच्या एका प्रकाशनात म्हटले आहे. चीनचे उपपंतप्रधान आणि सार्वजिनक सुरक्षामंत्री सीह फुन्चीह यांच्या निवेदनातून ही माहिती मिळाल्याचे या पत्राने म्हटले आहे. त्यांचे म्हणणे असे की, आपण केलेल्या अपराधांबद्दल होणाऱ्या शिक्षेच्या भयाने सांस्कृतिक क्रान्तीच्या वेळी अनेक लोकांनी आत्महत्या केली. परंतु अलीकडे या प्रमाणात भयानक वाढ झाली असून वेळीच पायबंद घातला गेला नाही तर क्रान्तिकार्यास जबर खीळ बसण्याचा संभव आहे.

(२५ सप्टेंबर १९६८च्या अंकातून)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज