अ‍ॅपशहर

50 yrs

शनिवार १७ फेब्रुवारी १९६८मालाड स्टेशनची नासधूसमुंबई पश्चिम रेल्वेच्या मालाड स्टेशनवर संतप्त उतारूनी आज दुपारी बुकिंग ऑफिस, सिग्नल केबिन व दोन ...

Maharashtra Times 19 Feb 2018, 3:38 am
शनिवार १७ फेब्रुवारी १९६८
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 50 yrs
50 yrs


मालाड स्टेशनची नासधूस

मुंबई पश्चिम रेल्वेच्या मालाड स्टेशनवर संतप्त उतारूनी आज दुपारी बुकिंग ऑफिस, सिग्नल केबिन व दोन लोकल्सना आगी लावल्या. त्या आधी लोहमार्गावर धरणे धरून वाहतूकही त्यांनी बंद पाडली. जाळपोळ व नासधूस यामुळे रेल्वे मालमत्तेचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. पोलिस व संतप्त जमाव यांच्यातील चकमकीत ७१ माणसे जखमी झाली. त्यात ५३ पोलिस, ३ पोलिस अधिकारी व ५ रेल्वे पोलिस अधिकारी आहेत. नऊ डब्यांऐवजी सहाच डब्यांची लोकल सोडल्यामुळे हा प्रकार घडला. नऊ डब्यांच्या लोकलची मागणी गेली दीड वर्षे केली जात होती.

माला सिन्हा विवाह

मुंबई चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा आणि काठमांडचे कस्टम्स खात्याचे उपसंचालक चिदंबरप्रसाद लोहानी यांचा विवाह आज येथे तीन पद्धतीनी पार पडला. प्रथम इंडियन नॅशनल चर्चचे आर्च बिशप विल्यम्स यांनी ख्रिस्ती विधींनी त्यांचा विवाह लावला. नंतर माला सिन्हाच्या वांद्रे येथील निवासस्थानी नोंदणी अधिकाऱ्यापुढे दुसरा समारंभ झाला. अखेर वराच्या पेडर रोडवरील निवासस्थानी नेपाळातून आलेल्या हिंदु पुरोहिताने त्यांची लग्नगाठ बांधली. लोहानी राजगुरू घराण्यातील हिंदु ब्राह्मण आहेत तर माला सिन्हा ख्रिश्चन आहे.

शेतजमिनी परत

मुंबई महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे असलेल्या छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी लागवडीसाठी त्यांना परत देण्यासंबंधीचा राज्य सरकारचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, अशी घोषणा विधान परिषदेत आज महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यानी केली. विधीमंडळाचे चालू अधिवेशन संपन्न होण्यापूर्वीच सरकारचा निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मिशनरींकडून धर्मांतर

मुंबई नासिक व अहमदनगर जिल्ह्यात परकीय मिशनरी फादर फेरर यांचे काम सुरू झाल्यानंतर धर्मांतर केलेल्यांची संख्या ३०० वरून २००० वर गेली व हे लोक ख्रिश्चन झाले ही गोष्ट खरी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज