अ‍ॅपशहर

१६ वर्षांखालील मुलांच्या संघनिवडीवरून संताप

एकीकडे मुंबईचा १६ वर्षांखालील मुलांचा संघ निवडण्यासाठी पय्याडे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झालेली असताना या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंवरून मुंबईतील क्रिकेट वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. कामगिरी करूनही निवड झालेल्या मुलांच्या पालकांकडून या निवडीबद्दल संताप व्यक्त होऊ लागला आहे.

Maharashtra Times 27 Sep 2018, 4:00 am
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cricket2


एकीकडे मुंबईचा १६ वर्षांखालील मुलांचा संघ निवडण्यासाठी पय्याडे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झालेली असताना या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंवरून मुंबईतील क्रिकेट वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. कामगिरी करूनही निवड झालेल्या मुलांच्या पालकांकडून या निवडीबद्दल संताप व्यक्त होऊ लागला आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या प्रत्येकी १५ खेळाडूंच्या चार संघांसाठी निवड करताना कल्पेश कोळी १६ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेतील कामगिरीचा प्रामुख्याने विचार केला जातो, पण त्या स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही काही खेळाडू मात्र पय्याडे ट्रॉफी स्पर्धेपासून वंचित राहिल्याने पालकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कामगिरी करूनही जर या संघांत स्थान मिळत नसल्यामुळे आमच्या मुलांचे हे वर्ष वाया गेले, अशी खंत पालक व्यक्त करत आहेत. यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे काही पालकांनी पत्रव्यवहारही केला आहे. पय्याडे ट्रॉफी स्पर्धेला प्रारंभ झाला असल्यामुळे आता या मुलांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जाईल का, असा सवालही उपस्थित होत आहे.

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा पार पडल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने ८३ खेळाडूंची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली होती. या खेळाडूंना नंतर निवड चाचणीसाठी बोलावण्यात आले. प्रत्यक्षात त्याठिकाणी दुप्पट खेळाडू उपस्थित होते. त्या खेळाडूंमधून सरस कामगिरी असताना त्यांच्यापेक्षा कमी धावा किंवा बळी मिळविलेल्या खेळाडूंना का निवडण्यात आले असा पालकांचा सवाल मुंबई क्रिकेट असोसिएशनला आहे. स्वयम वाघमारे या खेळाडूने कल्पेश कोळी स्पर्धेत एकूण १४१ धावा केल्या होत्या आणि त्यात ७८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याशिवाय, त्याने २ विकेटसही घेतल्या. स्वराज परुळकरने १३५ धावांत ८२ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. सुमेर झवेरीच्या खात्यात ११८ धावा आणि १ विकेट तसेच ८८ धावांची खेळी जमा होती. तर निशांत कदमने ४ सामन्यांत ५३ धावांच्या खेळीसह १११ धावा आणि ७ विकेटस नोंदविल्या. मोक्ष वंजारी ११४ धावा आणि सर्वोच्च ८२, आदर्श सिंग ८ बळी, अॅरन रॉड्रिग्ज ६ बळी या खेळाडूंचा विचार अतुल रानडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने का केला नाही, असा पालकांचा प्रश्न आहे.

कल्पेश कोळी स्पर्धेत गोरेगाव केंद्रातून मोक्ष वंजारीच्या ११४ धावा आहेत. त्याच संघातून वरुण राव (१ सामना, एकही धाव नाही, एकही विकेट नाही), खुश जैन (२ सामने ११ धावा, १ विकेट) यांचा विचार मात्र झाला आहे. पण मोक्ष वंजारीचा नाही. घाटकोपर केंद्रातून स्वयम वाघमारेने ७८ धावांच्या खेळीसह १४१ धावा केल्या आहेत २ विकेटसही त्याच्या नावावर जमा आहेत पण त्याच संघातून शुभम गिरकर ४८ धावा, जय जैन (१३२ धावा, ३७ सर्वोच्च) यांची निवड झाली आहे. कलिना संघातून साद अहमद (१ सामना, एकही धाव नाही, एकही विकेट नाही), निलय पवार (२ सामने ७ धावा, १ विकेट), दिव्यांशू सिंग (२ सामने ३४ धावा, २ विकेट), रेने पारेख (३ सामने ८८ धावा, २७ सर्वोत्तम), डीवाय पाटील केंद्राकडून हर्ष मोगावीरा (२ सामने, ३२ धावा, १२ सर्वोच्च), झैद पाटणकर (२ सामने, एकही धाव नाही, एकही विकेट नाही), कांदिवली केंद्राकडून निशांत कदमने ७ विकेटस १११ धावा केलेल्या असताना करण सुरय्या (३ सामने ३४ धावा), राजवर्धन राव (१ सामना, २२ धावा १ बळी) तर शिवाजी पार्क केंद्रातून स्वराज परुळकरने १३५ धावा करूनही अर्जुन दाणी (८६ धावा, सर्वोच्च ६०) यांची निवड झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अधिराज सिंग आणि संयम जैन हे खेळाडू तर कल्पेश कोळी स्पर्धेत खेळलेले नाहीत तरीही त्यांची निवड पय्याडे स्पर्धेसाठी कशी झाली, असाही पालकांचा सवाल आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पालकांच्या या संतापाचे पडसाद उमटले असून याबाबत आता कोणती पावले उचलली जातात हे पाहावे लागेल. यासंदर्भात एमसीएशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज