अ‍ॅपशहर

LBW घेण्यात कुंबळे माहीर, सचिन 'विक्रमवीर'

कसोटीत सर्वाधिक वेळा पायचीत होण्याचा आणि सर्वाधिक वेळा फलंदाजांना पायचीत पकडण्याचा विक्रम भारताच्याच दोन महान माजी क्रिकेटवीरांच्या नावावर आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? हे दोन शिलेदार म्हणजे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि 'जम्बो' अनिल कुंबळे.

Maharashtra Times 29 Dec 2016, 3:58 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anil kumble and sachin tendulkar top lbw wicket taker and getting out
LBW घेण्यात कुंबळे माहीर, सचिन 'विक्रमवीर'


क्रिकेटमध्ये एकूण दहा प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. त्यातला एलबीडब्ल्यू अर्थात पायचीत हा प्रकार सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण, कसोटीत सर्वाधिक वेळा पायचीत होण्याचा आणि सर्वाधिक वेळा फलंदाजांना पायचीत पकडण्याचा विक्रम भारताच्याच दोन महान माजी क्रिकेटवीरांच्या नावावर आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? हे दोन शिलेदार म्हणजे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि 'जम्बो' अनिल कुंबळे.

द. आफ्रिकेचा हाशिम आमला कालच कसोटी क्रिकेटमधील एलबीडब्ल्यूचा १० हजारावा बळी ठरला. त्यानंतर, जुने रेकॉर्ड तपासताना समोर आलेली माहिती भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी नक्कीच रंजक आहे. सर्वाधिक वेळा पायचीत होणाऱ्यांच्या यादीत क्रिकेटमधील विक्रमादित्य सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. तो ६३ वेळा पायचीत झाला होता. त्याच्या खालोखाल विंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल आणि इंग्लंडच्या ग्रॅहम गूचचा नंबर येतो. हे दोघं अनुक्रमे ५५ आणि ५० वेळा एलबीडब्ल्यू झाले होते. इंग्लंडचा सध्याचा कर्णधार अॅलिस्टर कूक आत्तापर्यंत ४७ वेळा पायचीत झाला आहे. तो सचिनला मागे टाकतो का हे पाहावं लागेल.

दुसरीकडे, फलंदाजांना पायचीत पकडण्यात भारताचाच फिरकीपटू अनिल कुंबळे माहीर असल्याचं दिसतं. कसोटीत कुंबळेच्या नावावर ६१९ विकेट आहेत. त्यापैकी १५६ विकेट एलबीडब्ल्यू आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेणाऱ्या मुथय्या मुरलीधरननं १५० वेळा फलंदाजांना पायचीत पकडलंय. तिसऱ्या क्रमांकावर आहे, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न. त्याच्या एकूण ७०८ विकेटपैकी १३८ पायचीत आहेत.

आपल्या करिअरमध्ये एकदाही एलबीडब्ल्यू न झालेला एकमेव शिलेदार म्हणजे ऑस्ट्रेलियाचा जोए डार्लिंग. १८८४ ते १९०५ दरम्यान ते ३४ कसोटी सामने खेळले पण त्यात एकदाही पायचीत झाले नव्हते. तर, ऑस्ट्रेलियाचेच क्लॅम हिल ८९ डावात फक्त एकदाच पायचीत झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज