अ‍ॅपशहर

आणखी सुपर ओव्हर असावी !

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेता घोषित करताना ज्याने सर्वाधिक चौकार लगावले त्यांना झुकते माप देण्याच्या नियमावर बरीच टीका झाल्यानंतर विश्वविक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या नियमाऐवजी आणखी एक सुपर ओव्हरचा नियम असणे आवश्यक आहे, अशी टिप्पणी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2019, 4:00 am
मास्टरब्लास्टर सचिनची टिप्पणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम another super over
आणखी सुपर ओव्हर असावी !


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेता घोषित करताना ज्याने सर्वाधिक चौकार लगावले त्यांना झुकते माप देण्याच्या नियमावर बरीच टीका झाल्यानंतर विश्वविक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या नियमाऐवजी आणखी एक सुपर ओव्हरचा नियम असणे आवश्यक आहे, अशी टिप्पणी केली आहे.

लॉर्डसवर झालेल्या इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील थरारक अंतिम सामन्यात निर्धारित षटकात सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये लढत खेळविली गेली पण तिथेही दोन्ही संघ बरोबरीत राहिले. परिणामी, सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या इंग्लंड संघाला विजेता घोषित करण्यात आले. त्यावरून बरेच रामायण घडले.

सचिनने यावर म्हटले आहे की, माझ्या मते आणखी एक सुपर ओव्हर असायला हरकत नाही. दोन्ही संघांनी ठोकलेले चौकार विचारात घेण्याऐवजी विजेता घोषित करण्यासाठी आणखी एक सुपर ओव्हरच असावी. आणि हे केवळ वर्ल्डकप अंतिम फेरीसाठी नव्हे तर प्रत्येक अशा सामन्यात या नियमाचा अवलंब करावा. प्रत्येक सामना शेवटी महत्त्वाचा आहे.

या सामन्यानंतर रोहित शर्मा, गौतम गंभीर, युवराज सिंग यांनी या नियमावर बोट ठेवले.

उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराटने म्हटले की, आयपीएलप्रमाणे बाद फेरीतील सामने असले पाहिजेत. त्यावर सचिन म्हणतो की, जे संघ पहिल्या दोन क्रमांकावर असतील त्यांना नक्कीच संधी मिळायला हवी. हे संघ सातत्यपूर्ण खेळल्यामुळे त्यांना थोडी संधी मिळायला हरकत नाही.

महेंद्रसिंग धोनीला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवल्याबद्दल सचिनला प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला की, मी तरी धोनीला पाचव्या क्रमांकावरच पाठवले असते, यात कोणतीही शंका नाही. हार्दिक पंड्याला सहाव्या तर कार्तिकला सातव्या क्रमांकावर पाठवायला हवे होते. डावाला आकार धोनीच देऊ शकला असता.

दृष्टीक्षेप

वर्ल्डकप अंतिम फेरीच नव्हे तर कोणत्याही स्पर्धेतील सामन्याचा निकाल जाहीर होण्यासाठी आणखी एक सुपर ओव्हर असावी.

आयपीएलप्रमाणे बाद फेरीत अव्वल संघांना आणखी एक संधी मिळायला हवी.

धोनीला पाचव्या क्रमांकावर पाठवायला हवे होते.

हार्दिक आणि कार्तिकला सहाव्या, सातव्या क्रमांकावर पाठवता आले असते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज