अ‍ॅपशहर

ऑस्ट्रेलियाने जिंकली तिरंगी मालिका

वृत्तसंस्था, ऑकलंडग्लेन मॅक्सवेल आणि अॅरॉन फिंच यांच्या चमकदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने ट्रान्स-टस्मान टी-२० तिरंगी मालिका जिंकली...

Maharashtra Times 22 Feb 2018, 12:00 am
वृत्तसंस्था, ऑकलंड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम australia tri series triumph
ऑस्ट्रेलियाने जिंकली तिरंगी मालिका


ग्लेन मॅक्सवेल आणि अॅरॉन फिंच यांच्या चमकदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने ट्रान्स-टस्मान टी-२० तिरंगी मालिका जिंकली. बुधवारी पावसाचा फटका बसलेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर डकवर्थ लुइस नियमांनुसार १९ धावांनी मात केली. इडन पार्क येथे पार पडलेल्या या अंतिम फेरीत मॅक्सवेलने २०, तर फिंचने नाबाद १८ धावांची खेळी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचे जेतेपद अधिक सोपे झाले.

या तिरंगी मालिकेतील सर्वच सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३ बाद १२१ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला. यामुळे डकवर्थ लुइस नियमांचा अवलंब करण्यात आला. 'मालिकेतील अगदी पहिल्या सामन्यातील पहिल्या चेंडूपासून जबरदस्त क्रिकेट खेळत आहोत. जे काही कराल त्यात सर्वस्व अर्पण करा, असे मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले होते. अनेक जण म्हणतात की, टी-२० क्रिकेटला गांभीर्याने घेऊ नका; पण या संघातील खेळाडूंनी झोकून देत कामगिरी केली. मला या संघाचा अभिमान वाटतो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील गुणवत्ता यातून झळकते', असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणाला.

इडन पार्क हे मैदान लहान असल्याने येथे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करू नये, अशी नाराजी व टीका या स्टेडियमवर होते. याच मैदानावर गेल्या शुक्रवारी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांनी या टी-२० मालिकेच्या लढतीत २४०पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. यजमान न्यूझीलंडने या फायनलची सुरुवात झोकात केली. मार्टिन गप्टिल (२१) व कॉलिन मन्रो (२९) यांनी ४.३ षटकांत न्यूझीलंडच्या बोर्डावर ४.३ षटकांत ४८ धावा लावल्या. मात्र न्यूझीलंडच्या त्यानंतरच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आली. न्यूझीलंडच्या आव्हानातील हवाच काढून टाकणारा ऑस्ट्रेलियाचा अॅश्टन अगर सामनावीर ठरला. त्याने २७ धावांत तीन मोहरे टिपले.

आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ख्रिस लिन फलंदाजीस आला नाही. सूर मारून क्षेत्ररक्षण करत असताना त्याचा खांदा दुखावला. मात्र त्याचा बागुलबुवा न करता ऑस्ट्रेलियाने बेधडक खेळ केला. मुख्य म्हणजे लिनच्या खांद्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र सूर मारताना तो विचित्ररित्या पडला. ऑस्ट्रेलियाचे फिझिओ अॅलेक्स काँटोरिस यांनी याबाबत पत्रकात म्हटले आहे की, 'त्याचा उतरलेला खांदा मैदानातच पुन्हा बसवला. थोड्याशा व्यायामाच्या आधारे ते झाले. मात्र त्यांच्या खांद्याचा एक्सरे काढला असून त्यात त्याच्या हाडांवर गंभीर इजा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पाकिस्तान सुपर लीगसाठी तो दुबईला जाणार नाही. तो आता ब्रिस्बेनला परतणार असून तिथे त्याच्यावर पुढील उपचार व चाचण्या होतील'.

स्कोअरबोर्डः न्यूझीलंड २० षटकांत ९ बाद १५० (मार्टिन गप्टील २१, कॉलिन मन्रो २९, रॉस टेलर नाबाद ४३; केन रिचर्डसन ४-०-३०-२, अँड्र्यू टाय ४-०-३०-२, अॅश्टन अगर ४-०-२७-३) डकवर्थ लुइस नियमानुसार पराभूत वि. ऑस्ट्रेलिया १४.४ षटकांत ३ बाद १२१ (डेव्हिड वॉर्नर २५, डार्सी शॉर्ट ५०, मॅक्सवेल नाबाद २०, फिंच नाबाद १८; सोधी ४-०-२१-१, सँटनर ३.४-०-२९-१, मन्रो २-०-१८-१).

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज