अ‍ॅपशहर

IPLमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली; द्रविड यांनीही चिंता व्यक्त केली, तर रोहित म्हणाला...

Rohit Sharma Press Conference: भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. ही लढत ७ ते ११ जून दरम्यान होणार असून त्याआधी भारतीय खेळाडू आयपीएलचा हंगाम खेळतील.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2023, 11:51 am
अहमदाबाद: ‘भारतीय कसोटी संघात असलेले खेळाडू आता आयपीएलमध्ये खेळतील. मात्र, ज्या कसोटीपटूंचे आयपीएल संघ बाद फेरीत दाखल होणार नाहीत, ते खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी दोन आठवडे लंडनमध्ये दाखल होतील. जेणेकरून त्या खेळाडूंना तेथील वातावरणाशी जुळवून घेता येईल,’ अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul dravid Rohit Sharma


आता आयपीएल महत्त्वाची की जागतिक कसोटीची फायनल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) हे जागतिक कसोटीच्या फायनलबाबत किती गंभीर आहे, हे आता खेळाडूंच्या तयारीवरून स्पष्ट होणार आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. गेल्या वेळी अपुऱ्या तयारीमुळे भारताला अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. आताही हाच प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानची अंतिम लढत ७ ते ११ जूनदरम्यान लंडनमध्ये होणार आहे. त्याआधी म्हणजे एक जूनला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा संपणार आहे. त्यामुळे आयपीएल संपल्यानंतर एका आठवड्याच्या आत ऑस्ट्रेलियाविरुद्धची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत खेळणे हे मोठे आव्हान असेल, असे सांगून भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही चिंता व्यक्त केली होती.

मागील वेळी लढत साउदम्प्टनला झाली होती. त्या वेळी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली होती. त्यामुळे वेगवान खेळपट्टीवर भारतीय संघाचा सराव कमी पडल्याचे स्पष्ट दिसत होते. आता लंडनमध्ये स्पर्धा असल्याने पुन्हा तीच वेळ भारतीय फलंदाजांवर येऊ शकते. ‘कसोटी जगज्जेतेपद लढत आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्या सामन्यात खेळणार असलेल्या सर्व खेळाडूंशी सतत संपर्कात राहू आणि त्यांच्या कार्यभारावर लक्ष ठेवणार आहोत. २१मेच्या जवळपास सहा संघ आयपीएलमध्ये बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडतील. तेव्हा या संघातील कसोटीपटूंना आम्ही ब्रिटनला पाठविण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणे करून त्यांना तेथे थोडा वेळ मिळेल.’

आयपीएल दरम्यान सराव

मोहम्मद सिराज (बेंगळुरू संघ), मोहम्मद शमी (गुजरात) आणि उमेश यादव (कोलकाता) हे आपापल्या आयपीएल संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यामुळे ते गटातील १४ पैकी किमान १२ लढती तरी खेळतील. यानंतर लगेचच फायनलसाठी त्यांना तयार राहावे लागेल. त्यामुळे त्यांच्यावरील कार्यभारावर लक्ष ठेवावे लागणार आहे. ‘आयपीएलदरम्यान आम्ही काही ड्युक (लाल) चेंडू सर्व वेगवान गोलंदाजांना देणार आहेत. जेणेकरून त्या चेंडूंवर त्यांना सराव करता येईल. अर्थात, प्रत्येक खेळाडू किती गांभीर्याने सराव करतो, हे महत्त्वाचे आहे,’ असे रोहित म्हणाला. इंग्लंडमध्ये कसोटी ड्युक चेंडूवर खेळल्या जातात. भारतात कसोटीसाठी ‘एसजी’, तर ऑस्ट्रेलियात ‘कुकाबुरा’ चेंडू वापरला जातो. सिराज, शमी, उमेश हे भारतीय कसोटी संघातील वेगवान गोलंदाज आहेत. आता व्यग्र वेळापत्रकात त्यांना सरावासाठी किती वेळ मिळतो, हे सांगणे अवघड आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख