अ‍ॅपशहर

WTC फायनलपूर्वी डेव्हिड वॉर्नरची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; कसोटी क्रिकेटला करणार अलविदा

David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन सलामीवीर आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. कोणत्या सामन्यानंतर कसोटीतून निवृत्ती घेणार हे त्याने सांगितले.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2023, 9:51 am
नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अगदी तोंडावर आला आहे. दोन्ही संघ ७जून पासून होणाऱ्या या अटीतटीच्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पण याचदरम्यान आता ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज आणि धाकड सलामीवीर खेळाडू डेव्हिड वॉर्नर यांना सर्वांना धक्का देणारी बातमी दिली आहे. डेव्हिड वॉर्नरने त्याच्या निवृत्तीबाबत पुन्हा एकदा उघडपणे भाष्य केले आहे. आता वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. तो लवकरच आता निवृत्त होणार असून कधी निवृत्ती घेईल याबाबत त्याने मोठी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम David Warner Retirement


डेव्हिड वॉर्नर हा जगातील स्फोटक फलंदाजांपैकी एक फलंदाज मानला जातो. त्याची बॅट एकदा तळपली की त्याला बाद करणं म्हणजे गोलंदाजांसाठी मोठा टास्क असतो. वॉर्नरला २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत खेळायचे आहे, असे त्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. आता वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. कसोटी फॉर्मशी झगडत असलेला ३६ वर्षीय वॉर्नर पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर कसोटी कारकिर्दीचा शेवट करेल अशी अपेक्षा आहे. वर्षाच्या अखेरीस पाकिस्तान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ३ जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.

डेव्हिड वॉर्नर करणार अलविदा

डेव्हिड वॉर्नर गेल्या काही काळापासून फॉर्मशी झुंजत आहे. गेल्या दोन वर्षांत खेळल्या गेलेल्या १७ कसोटींमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त एकच शतक पाहायला मिळाले आहे. तोपर्यंत तो संघाचा भाग असेल की नाही हे अद्याप निश्चित नाही. यासह वॉर्नरला आशा आहे की ऑस्ट्रेलियाच्या जर्सीतील त्याचा शेवटचा सामना वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळल्या जाणार्‍या २०२४ टी-२० विश्वचषकात होईल. यासोबतच यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर तो या फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतो.

डेव्हिड वॉर्नर म्हणाला, 'मी नेहमीच म्हणत आलो आहे की विश्वचषक हा माझा शेवटचा सामना असेल. जरी मी येथे धावा काढू शकलो आणि ऑस्ट्रेलियात खेळत राहिलो तरी मी वेस्ट इंडिज मालिका खेळणार नाही. जर मी आता धावा केल्या आणि पाकिस्तान मालिका गाठली तर मी तिथेच पूर्ण करेन. पाकिस्तान दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियात यावे लागणार आहे.


२००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

डेव्हिड वॉर्नरने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात त्याने ४३ चेंडूत ८९ धावांची तुफानी खेळी केली. तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू आहे, ज्याला प्रथम श्रेणी पदार्पणापूर्वी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत १०२ कसोटी, १४२ एकदिवसीय आणि ९९ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ८१५८ धावा, एकदिवसीय सामन्यात ६०३० धावा आणि टी-२० मध्ये २८९४ धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर ४५ आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

डेव्हिड वॉर्नर पुढच्या प्लॅनबद्दल म्हणाला - मला २०२४ चा वर्ल्ड कप खेळायचा आहे. हे माझ्या मनात आहे. त्याआधी आमच्याकडे भरपूर क्रिकेट सामने आहेत आणि नंतर मला वाटते की ते फेब्रुवारीपासून थांबेल. माझ्यासाठी, मला पुन्हा आयपीएल आणि इतर फ्रँचायझी लीग खेळावे लागतील, जेणेकरून मी जूनमध्ये खेळण्यास सक्षम होऊ शकेन.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख