अ‍ॅपशहर

पाकिस्तान दौऱ्यावर इंग्लंडचा काळजाचा ठोका चुकला, मुल्तानमधील हॉटेलजवळ झाला गोळीबार

PAK vs ENG 2nd Test - पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे खेळवला जाणार आहे. याआधी टीम हॉटेलजवळ गोळीबार झाल्याची बातमी आली होती. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी इंग्लंडचे खेळाडू हॉटेलमधून स्टेडियमसाठी निघणार असताना ही घटना घडली.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2022, 9:57 am
मुलतान: इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. इंग्लंडचा संघ १७ वर्षांनंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानाला पोहोचला आहे. उभय संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, त्यातील दुसरा सामना आजपासून म्हणजेच १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, इंग्लंडचा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, त्या हॉटेलजवळ गोळीबार झाल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Firing near the england players hotel in Multan


गुरुवारी मुल्तानमध्ये इंग्लंडचा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे. त्या हॉटेलजवळ गोळीबार झाल्याची बातमी आली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही. हा गोळीबार स्थानिक टोळक्यांमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. इंग्लंडचे खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी हॉटेलमधून स्टेडियमसाठी निघणार असतानाच ही घटना घडली. इंग्लंड संघाच्या हॉटेलपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाला नाही. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे खेळवला जाणार आहे.

वाचा: बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाचा नवा कॅप्टन, आता या खेळाडूच्या खांद्यावर देणार संघाची जबाबदारी

याप्रकरणी पाकिस्तान पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा खेळाडूंच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासन स्थानिक प्रशासनाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) दिले आहे. विशेष म्हणजे जिथे गोळीबार झाला ते ठिकाण इंग्लंड संघाच्या स्टेडियममध्ये येण्याच्या किंवा जाण्याच्या मार्गात येत नाही. या घटनेनंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर सराव सत्रात भाग घेतला. मुलतानमध्येही खेळाडूंसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मान अहमदनगरला, पाहा कधी ठरणार महाराष्ट्र केसरी!

या दौऱ्यापूर्वी पीसीबीने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. खेळाडूंच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले होते. इंग्लंडच्या संघाला पाकिस्तानमध्ये देशाच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेची पातळी देण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांशिवाय लष्करही इंग्लंड संघाच्या संरक्षणासाठी सज्ज आहे. इंग्लंड क्रिकेट संघाच्या प्रवक्त्याने संघाच्या सुरक्षा योजनेत कोणताही बदल केला नसल्याची पुष्टी केली आहे.

वाचा: सेहवागनं एका वाक्यात घेतला रोहित शर्मा आणि राहुल द्रविडचा समाचार, आता तरी डोळे उघडतील?

मार्च २००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामुळे कोणत्याही देशाने पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी नकार दिला होता. अनेक वर्ष हे चित्र असेच होते आणि यामुळेच पाकिस्तानला युएईमध्ये घरच्या मालिकेचे आयोजन करावे लागले.

इतकेच नाही तर गेल्या वर्षी न्यूझीलंड क्रिकेट संघ सुरक्षेचे कारण सांगून एकही सामना न खेळता पाकिस्तानातून मायदेशी परतला होता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये रावळपिंडीमध्ये तीन एकदिवसीय सामने आणि लाहोरमध्ये ५ टी-२० सामने खेळवले जाणार होते, परंतु न्यूझीलंड बोर्डाने हा दौरा रद्द केला. त्यावेळी न्यूझीलंड क्रिकेट संघाला ईमेलद्वारे धमक्या देण्यात आल्या होत्या.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख