अ‍ॅपशहर

पाकचा 'हा' क्रिकेटपटू बुमराहला म्हणाला 'बेबी बोलर'!

आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाकने हवेत तीर मारण्याचे काम केले आहे. बुमराह माझ्यासाठी 'बेबी बोलर' असून मी त्याची गोलंदाजी सहज खेळू शकतो, असा दावा रझ्झाकने केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2019, 7:19 am
कराची: आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणारा व आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाकने हवेत तीर मारण्याचे काम केले आहे. बुमराह माझ्यासाठी 'बेबी बोलर' असून मी त्याची गोलंदाजी सहज खेळू शकतो, असा दावा रझ्झाकने केला आहे. बुमराहवरील टोलेबाजीने रझ्झाक चांगलाच चर्चेत आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bumrah-razzak


जसप्रीत बुमराह डावाचं शेवटचं षटक टाकणार आहे. त्या षटकात विजयासाठी १५ धावांची आवश्यकता आहे आणि त्याच्यासमोर फलंदाजीला तू असशील तर तुझी रणनिती काय असेल, असा प्रश्न विचारला असता मी आरामात बुमराहचा सामना करेन व सामना जिंकून देईन, असा विश्वास रझ्झाकने व्यक्त केला. मी जगभरातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यामुळे बुमराहसमोर फलंदाजी करताना मला कोणतीच अडचण आली नसती. उलट गोलंदाज म्हणून बुमराहवरच दबाव पाहायला मिळाला असता, असे रझ्झाक म्हणाला. ग्लेन मॅकग्राथ, वासिम अक्रम आणि शोएब अख्तर यांसारख्या गोलंदाजांचा सामना केल्यानंतर तुमच्यातील आत्मविश्वास निश्चितच वाढतो. या सर्व गोलंदाजांचा मी सामना केला आहे. त्यामुळे तुलनेने बुमराह माझ्या लेखी 'बेबी बोलर' आहे, असे तारे रझ्झाकने तोडले.

क्रिकेट पाकिस्तानला रझ्झाकने मुलाखत दिली. एकीकडे बुमराहला बच्चा गोलंदाज म्हणताना दुसरीकडे रझ्झाकने त्याचे कौतुकही केले. सध्याच्या आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाजीवर नजर टाकल्यास त्यात बुमराह एक चांगला गोलंदाज आहे. त्याची हटके गोलंदाजी शैली हेच त्याच्या यशाचे रहस्य आहे, असे रझ्झाक म्हणाला. बुमराहने आपल्या गोलंदाजीत बरीच प्रगती केली आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची कला त्याने अवगत केलीय. त्यामुळे त्याच्या यशात सातत्य पाहायला मिळते, असेही रझ्झाक म्हणाला.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची तुलना होऊ शकत नाही. सचिन एका वेगळ्या उंचीवरचा फलंदाज होता, अशी स्तुती रझ्झाकने केली. १९९२ ते २००७ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर नजर टाकल्यास अत्यंत उच्च दर्जाचं क्रिकेट तेव्हा पाहायला मिळालं. अनेक महान क्रिकेटपटू या काळात खेळत होते. सध्या त्या तोडीचे क्रिकेटपटू उरलेले नाहीत. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत ती उंची आज पाहायला मिळत नाही, असेही रझ्झाक म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज