अ‍ॅपशहर

क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं, दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं...

आपल्या किती धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे हे दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघाला माहिती असतं किंवा आपल्याला किती धावांचा बचाव करायला आहे, हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला माहिती असतं, पण एक अजबच प्रकार यावेळी घडल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2021, 5:51 pm
नवी दिल्ली : क्रिकेटच्या इतिहासामध्ये कदाचित ही गोष्ट पहिल्यांदाच घडलेली असेल. कारण सामन्याची दुसरी इनिंग सुरु झाल्यावरही दोन्ही संघांना नेमकं टार्गेट काय आहे, हेच समजू शकलं नाही. आतापर्यंत ही गोष्ट यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती, पण आज ही गोष्ट घडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम डकवर्थ-लुईस नियम (हा फोटो प्रतिनिधीक आहे.)


नेमकं घडलं तरी काय...
न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये आज ट्वेन्टी-२० सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडची पहिली फलंदाजी होती. न्यूझीलंडच्या संघाने १७.५ षटकांत ५ बाद १७३ अशी मजल मारली होती. त्यावेळी मैदानात पावसाचे आगमन झाले. पाऊस जोरदार पडत असल्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. पाऊस संपल्यावर न्यूझीलंडचा फलंदाजीची संधी न देता डकवर्थ-लुईस नियमांनुसार सामना खेळवण्याचा निर्णय देण्यात आला.

न्यूझीलंड फलंदाजी करणार नसल्यामुळे आता बांगलादेशचा संघ फलंदाजीला उतरला होता. पण मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या सलामीवीरांना किती धावांचे टार्गेट आहे, हेच समजू शकले नाही. त्याचबरोबर किती धावांचे आव्हान बांगलादेशच्या समोर ठेवण्यात आले असून त्याचा बचाव करायचा आहे, हेदेखील न्यूझीलंडच्या संघाला समजू शकले नाही. कारण बांगलादेशचे खेळाडू तीन चेंडू खेळूनही झाले होते, पण त्यांना किती धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा हे समजू शकले नव्हते.

डकवर्थ-लुईस नियमांनुसार बांगलादेशला किती धावांचे आव्हान द्यायचे, या समीकरणामध्या सामनाधिकारी मार्टिन क्रो हे पुरते गोंधळून गेले होते. ते सातत्याने डकवर्थ-लुईस नियमांनुसार किती धावांचे आव्हान द्यायचे, यामध्येच गोंधळून गेले होते. त्यानंतर बांगलादेशचे प्रशिक्षक मार्टिन यांना जाऊन भटले आणि त्यानंतर अखेर बांगलादेशला विजयासाठी १६ षटकांमध्ये १७१ धावांचे आव्हान देण्यात आले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग बांगलादेशच्या संघाला करता आला नाही, कारण त्यांना यावेळी १४२ धावांवरच समाधान मानावे लागले. न्यूझीलंडच्या संघाने यावेळी हा सामना डकवर्थ-लुईस नियमांनुसार २८ धावांनी जिंकल्याचे पाहायला मिळाले.

महत्वाचे लेख