अ‍ॅपशहर

फक्त एक चेंडू... भारताच्या पराभवासाठी नेमका कोणता ठरला टर्निंग पॉइंट, जाणून घ्या...

IND vs AUS : भारतीय संघ हा सामना जिंकेल असे वाटत होते. पण यावेळी फक्त एक चेंडू वाईट पडला आणि तिथेच भारताच्या हातून हा सामना निसटल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट घडली ती १८व्या षटकात. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ही गोष्ट घडली होती.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 20 Sep 2022, 11:02 pm
मोहली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चांगलाच रंगला. पण या सामन्यात भारताला २०८ धावा करूनही पराभलव पत्करावा लागला. भारताचा पराभव या सामन्यात नेमका कोणत्या गोष्टीमुळे झाला, हे आता स्पष्ट झाले आहे. एकच चेंडू भारतासाठी टर्निं पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs aus
सौजन्य-ट्विटर


मॅथ्यू वेड हा अखेरच्या षटकात फलंदाजीला आला आणि त्याने दमदार फटकेबाजी करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवायला सुरुवात केली. पण वेड फटकेबाजी करत असताना भारताकडून एक मोठी चुक घडली आणि त्याचा फटका त्यांना बसला. या एका चेंडूमुळे हा सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट घडली ती १८व्या षटकात. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हर्षलकडून आपल्या गोलंदाजीवरच ही चूक घडल्याचे पाहायला मिळाले. हर्षलने हा दुसरा चेंडू चांगला टाकला होता, या चेंडूचा समर्थपणे सामना वेडला करता आला नाही. त्यामुळे हा चेंडू मारताना तो चकला आणि त्याचा झेल उडाला. हा झेल थेट हर्षलजवळ आला. हर्षल आता हा झेल पकडेल आणि वेड बाद होईल, असे वाटत होते. पण हा झेल हर्षलच्या हातून सुटला आणि वेडला जीवदान मिळाले. यावेळी वेड हा २३ धावांवर होता. त्यानंतर धडाकेबाज फटकेबाजी करत वेडने नाबाद ४५ धावांची खेळी साकारली आणि सामना ऑस्ट्रेलियाला जिंकवून दिला.

भारताच्या २०९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्या षटकात त्यांनी तब्बल चार चौकार लगावले. पण त्यानंतर अक्षर पटेलने आरोन फिंचला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि स्टीव्हन स्मिथ यांची चांगलीच भागीदारी रंगली. ग्रीनने यावेळी आपले धडाकेबाज अर्धशतकही साकारले. या दोघांनाही यावेळी भारतीय खेळाडूंनी झेल सोडत जीवदानही दिले. सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकतोय, असे वाटत होते. पण त्याचवेळी अक्षर पटलने ग्रीनला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. ग्रीनने यावेळी ३० चेंडूंत ६१ धावांची दमदार खेळी साकारली. ग्रीन बाद झाल्यावर स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल ही अनुभवी जोडी मैदानात होती. पण उमेश यादवने यावेळी एकाच षटकात या दोघांना बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. भारत हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण मॅथ्यू वेडने धमाकेदार फटकेबाजी करत सामना फिरवला.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख