अ‍ॅपशहर

IND vs ENG : अमित शहा यांनी द्विशतक झळकावण्याच्या शुभेच्छा दिलेल्या खेळाडूने किती धावा केल्या, पाहा...

अहमदाबादच्या स्टेडियमध्ये उद्घाटन झाल्यावर भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी भाष केले होते. या भाषणात भारताच्या एका खेळाडूने द्विशतक पूर्ण करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या होत्या. पण या खेळाडूला नेमक्या किती धावा करता आल्या, पाहा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2021, 9:07 pm
अहमदाबाद, IND vs ENG : भारताचे गृहमंत्री अमित शहा यावेळी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या उद्धाटनाला उपस्थित होते. त्यावेळी शहा यांनी आपल्या भाषणामध्ये बऱ्याच क्रिकेटपटूंचा उल्लेख केला. यावेळी भारताच्या एका खेळाडूने द्विशतक पूर्ण करावे आणि भारताला विजय मिळवून द्यावा, असे म्हटले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amit shah


अमित शहा यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, " पुजाराने जेव्हा इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे अखेरची कसोटी खेळली होती तेव्हा त्याने द्विशतक केले होते. पुजाराने पुन्हा एकदा तशीच कामगिरी करावी आणि भारताला विजय मिळवून द्यावा."

पुजाराला गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावता आलेले नाही. पण पुजाराने महत्वाच्या वेळी मैदानात शड्डु ठोकल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. पुजाराने मैदानात उभे राहत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला सामना अनिर्णित राखून देण्यातही सिंहाचा वाटा उचलला आहे.

आजच्या सामन्यात पुजारा कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण पुजाराला या सामन्याच्या पहिल्या डावात एकही धाव करता आली नाही. पुजाराला यावेळी फक्त चार चेंडूंचा सामना करता आला. इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लिचने यावेळी पुजाराला पायचीत पकडले. पंचांनी यावेळी पुजाराला बाद दिले होते. पण त्यानंतर पुजाराने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तिसऱ्या पंचांनीदेखील पुजारा आऊट असल्याचे सांगितले होते.

पुजाराला पहिल्या डावात एकही धाव करता आलेली नाही. पण आता दुसऱ्या डावात पुजारा किती धावा करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. कारण पुजारा हा भारताचा तंत्रशुद्ध खेळाडू आहे आणि तो फक्त कसोटी क्रिकेटमध्येच भारताचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या कसोटी सामन्यात पुजाराकडून कशी फलंदाजी होते, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

इंग्लंडला पहिल्या डावात ११२ धावा करता आल्या...इशांत शर्माने तिसऱ्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डॉमनिक सिबलीला शून्यावर बाद केले. त्यानंतर जॉनी बेयरस्टोला अक्षरने शून्यावर बाद करून इंग्लंडची अवस्था २ बाद २७ केली. बेयरस्टो बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने क्रॉली सोबत ४७ धावांची भागिदारी केली. ही जोडी इंग्लंडला सावरेल असे वाटत असताना अश्विनने रुटची विकेट घेतली. त्यानंतर पहिले सत्र संपल्याआधी अक्षरने क्रॉलीला ५३ धावांवर बाद केले. दुसऱ्या सत्रात इंग्लंडची आणखी वाइट अवस्था झाली. ८१ धावांवर त्यांच्या दोन विकेट पडल्या. ओली पोपला अश्विनने तर अक्षरने बेन स्टोक्सला बाद केले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना मोठी धावसंख्या उभी करू दिली नाही. जोफ्रा आर्चरला अक्षरने, जॅक लीचला अश्विनने बाद केले आणि पाहूण्यांची अवस्था ८ बाद ९८ अशी केली. अखेर च्या दोन फलंदाजांना झटपट बाद करून भारताने इंग्लंडला फक्त ११२ धावांवर रोखले. भारताकडून अक्षर पटेलने सलग दुसऱ्या कसोटीत पाच विकेट घेतल्या. त्याने ३८ धावात ६ विकेट घेतल्या. तर आर अश्विनने २६ धावात ३ विकेट घेतल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज