अ‍ॅपशहर

पहिल्या दिवशी कांगारूंची शिकार करत भारताने रचला विजयाचा पाया, रवींद्र जडेजा ठरला कर्दनकाळ

IND vs AUS : पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताने कांगारूंची शिकार केली आहे. त्यासह भारताने या विजयाचा पाया रचल्याचे समोर आले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला १७७ धावांवर ऑलआऊट केले आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 9 Feb 2023, 5:05 pm
नागपूर : कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला फिरकीच्या तालावर चांगलेच नाचवले. भारताच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाने लोटांगण घातले आणि त्यामुळेच त्यांना १७७ धावांवर समाधान मानावे लागले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा चांगलाच चमकला. रोहितने यावेळी ५६ धावांची दणदणीत खेळी साकारली. त्यामुळे भारताची पहिल्या दिवसअखेर १ बाद ७७ अशी स्थिती आहे. भारत आता १०० धावांनी पिछाडीवर आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ravindra Jadeja
सौजन्य-पीटीआय


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या कसोटी सामन्याचा टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजाई करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांच्यावरच उलटला असे नक्कीच म्हणता येईल. प्रथम फलंदाजाई करणाऱ्या कांगारू संघाचे भारतीय गोलंदाजांनी चांगलेच कंबरडे मोडले. सामन्याच्या सुरुवातीलाच विकेट घेत त्यांच्या सलामीवीरांना दुहेरी आकडाही गाठण्याची संधी दिली नाही. तर लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संघाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ही मैदानावर राहता आले नाही.

सामन्याच्या सुरुवातीलाच मोहम्मद सिराज आणि मोहम्द शमी यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात विकेट्स घेत धक्के दिले. तर बराच वेळ संघाला विकेट घेता आली नाही पण त्यांनी फलंदाजांवर आपली पकड मजबूत ठेवली. पहिल्या ब्रेकनंतर जडेजाने लागोपाठ तीन विकेट्स घेतले. त्याने स्मिथ आणि लाबुशेनची भागीदारी तोडत रेनेशॉलाही बाद केले. तर नंतर अश्विनने दोन विकेट्स घेतल्या. तर पुन्हा जडेजाने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत २ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट केले.

भारताच्या डावात भारताकडून रोहित शर्माची दमदार खेळी पाहायला मिळाली. एकिकडे लोकेश राहुल चाचपडत खेळत होता. पण दुसरीकडे मात्र रोहित हा समर्थपणे गोलंदाजीचा सामना करत असल्याचे पाहायला मिळाले. रोहितने यावेळी चांगली फटकेबाजी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने यावेळी ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५६ धावा केल्या, त्यामुळेच भारताला १ बाद ७७ अशी मजल मारता आली आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख