अ‍ॅपशहर

सूर्याचं अवघ्या ४९ चेंडूंत वादळी शतक, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना रडवलं; भारताचा धावांचा डोंगर

Suryakumar Yadav : गेल्या काही दिवसांपासून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सूर्यकुमारला आज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली होती.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2022, 2:31 pm
माउंट माऊनगानुई : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने तडाखेबंद फटकेबाजी करत शतकी खेळी साकारली आहे. सूर्यकुमारने अवघ्या ५१ चेंडूंत १११ धावा फटकावल्या. सूर्यकुमारच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suryakumar yadav
सूर्यकुमार यादवचं शतक


न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा पर्याय निवडला. मात्र भारताच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत न्यूझीलंडचा हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताकडून इशान किशन आणि ऋषभ पंत ही नवी जोडी सलामीसाठी मैदानात उतरली. परंतु ऋषभला या संधीचा फायदा उठवता आला नाही. ऋषभ १३ चेंडूत केवळ ६ धावा करून बाद झाला. तर भारताचा दुसरा सलामीवर इशान किशनने ३१ चेंडूंत ३६ धावांची खेळी केली.

गेल्या काही दिवसांपासून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सूर्यकुमार यादवला आज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली होती. सूर्याने या संधीचं अक्षरश: सोनं करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. मैदानातील सर्वच भागात फटकेबाजी करत सूर्यकुमारने सामन्याच्या १९ व्या षटकात शतक साजरं केलं. ४९ चेंडूंत शतक करणाऱ्या सूर्याने पुढील दोन चेंडूंत एक चौकार आणि षटकार खेचत आपली धावसंख्या १११ वर नेली. मात्र अखेरच्या षटकात सूर्यकुमार स्ट्राइकवरच येऊ शकला नाही.

अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूंवर कर्णधार हार्दिक पांड्याने दोन धावा घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. तर नंतरच्या तीन चेंडूंवर न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज टीम साऊथी याने भारताचे सलग तीन फलंदाज बाद करत हॅट्रिक घेण्यात यश मिळवलं.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख