अ‍ॅपशहर

ना विजय, ना ड्रॉ... भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कोणता एकमेव सामना बरोबरीत सुटला होता जाणून घ्या...

IND vs AUS : तब्बल १०२ सामने झाले, पण टाय सामना हा फक्त एकच. भारत आणि ऑस्ट्रेलियातील एकमेव टाय झालेला सामना हा नेमका कधी झाला होता आणि त्यामध्ये काय घडलं होतं, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 7 Feb 2023, 9:14 pm
नवी दिल्ली : कसोटी सामन्यात एक तर विजय पाहायला मिळतो किंवा लढत अनिर्णित राहते. पण आतापर्यंत कसोटी सामना बरोबरीत सुटला, असे कदाचित तुम्ही ऐकले नसेल. पण अशी गोष्ट घडली आहे आणि तीदेखील भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात. भारत आणि ऑस्ट्रेलियात आतापर्यंत १०२ कसोटी सामने झाले आहेत. पण या १०२ सामन्यांमध्ये एकच सामना असा आहे की जो बरोबरीत सुटलेला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs AUS
हा फोटो प्रातिनिधक स्वरुपात वापरण्यात आला आहे...


कसोटी बरोबरीत (टाय) सुटण्याची घटना दुर्मीळ असते. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या १०२ कसोटी सामन्यांपैकी एक कसोटी बरोबरीत सुटली आहे. १९८६मध्ये ॲलन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता. यातील पहिली कसोटी सप्टेंबरमध्ये चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळली गेली. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ७ बाद ५७४ धावांवर घोषित केला. यानंतर भारताला ३९७ धावांत रोखून १७७ धावांची आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ५ बाद १७० धावांवर घोषित करून भारतासमोर विजयासाठी ३४८ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ६ बाद ३३१ अशी मजल मारली होती. रवी शास्त्री-चेतन शर्मा ही जोडी भारताला विजय मिळवून देईन असे वाटत होते. मात्र, चेतन शर्मा, किरण मोरे, शिवलाल यादव एकापाठोपाठ बाद झाले. शास्त्रींनी लढा दिला खरा; पण लढत टाय झाल्यावर मनिंदरसिंग बाद झाले आणि भारताचे विजयाचे स्वप्न भंगले.

आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियातील बरेच सामने चांगलेच रंगतदार झाले आहेत. पण या टाय सामन्यात मात्र चांगलीच रंजकता भरलेली होती. हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता ताणली गेली होती. भारत हा सामना जिंकण्याच्या जवळ आला होता. पण भारताच्या नशिबात हा विजय नव्हता. भारतीय संघ जिंकणारा सामना अखेर टाय झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र आतापर्यंत अजून असा टाय सामना दोन्ही देशांमध्ये पाहायला मिळाला नाही. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला काही तास उरले आहेत. त्यामुळे या मालिकेत कोणता संघ विजय मिळवतो, याची उत्सुकता सर्वांना असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख