अ‍ॅपशहर

WTC 2023: ओव्हल मैदानावर शुभमनला आली लग्नाची मागणी, लाइव्ह मॅचमध्ये 'तिने' केलं प्रपोज

Shubman Gill: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलने मोठी चूक केली. भारतीय संघाला विकेट घेण्याची सोपी संधी होती पण गिलमुळे ती गमावली. यामुळे सर्व खेळाडू निराश झाले, त्यानंतर स्टँडमधून गिलसाठी लग्नाचा प्रस्ताव आला.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jun 2023, 9:58 am
लंडन: भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. टीम इंडियासाठी अप्रतिम खेळी खेळून गिलने आयपीएल २०२३ मध्येही त्याची बॅट चांगलीच फॉर्मात होती. जानेवारीमध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये द्विशतक झळकावले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्येही शतक झळकावले. त्यामुळे त्याची फॅन फॉलोइंगही खूप वाढली आहे. गिल सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. याच दरम्यान त्याच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shubman Gill (7)


गिलसाठी लग्नाची मागणी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला होता. त्यानंतर स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या एका महिला चाहत्याने शुभमन गिलसाठी लग्नाचा प्रस्ताव दिला. तिने तसे पोस्टर्स आणले होते. त्या पोस्टरवर लिहिले होते- "शुभमन माझ्याशी लग्न कर..." हा फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहे.


शुभमनने केली मोठी चूक

महिला चाहत्याचे पोस्टर पडद्यावर दाखवण्याआधी एका चेंडूआधी शुभमन गिलने मोठी चूक केली. मोहम्मद सिराजचा चेंडू मार्नस लबुशेनने खेळला. तिसर्‍या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना गिलने डायव्हिंग करून चेंडू रोखला. दरम्यान, नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभे असलेले लबुशेन आणि ख्वाजा यांच्यात गोंधळ उडाला आणि दोघेही बॅटिंग एंडच्या जवळ पोहोचले. गिलला आरामात उठून थ्रो मारण्याची संधी होती. पण त्याने न बघता चेंडू बॅटिंग एंडच्या दिशेने फेकला. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता. अशाप्रकारे भारतीय संघाने विकेट घेण्याची सोपी संधी गमावली.


गिलकडून अपेक्षा

अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिल अपयशी ठरला होता. अवघ्या १३ धावा करून तो स्कॉट बोलंडच्या गोलंदाजीवर बाद झाला. गिलला येणार चेंडू कळला नाही आणि त्याने बॅट उंचावली. तो चेंडू सरळ येऊन विकेटवर आदळला. आता दुसऱ्या डावात टीम इंडियाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. कारण भारताला अंतिम सामना जिंकायचा असेल तर मोठे लक्ष्य गाठावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाकडे २९६ धावांची आघाडी असून त्यांच्या ६ विकेट शिल्लक आहेत.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज