अ‍ॅपशहर

IPL च्या फायनलप्रमाणे WTC मध्येही पाऊस करणार बॅटिंग? वाचा असे झाल्यास कसा लागणार सामन्याचा निकाल

WTC Final Reserve Day: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ लंडनच्या ओव्हल क्रिकेट मैदानावर भिडणार आहेत. पण पावसाने जर पुन्हा घोळ घातला तर काय होणार, जाणून घ्या.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2023, 2:12 pm
लंडन: नुकताच आपण पावसाचा सर्वांत मोठा ड्रामा इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या अंतिम सामन्यात अनुभवला. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना हा वेळापत्रकानुसार रविवार, २८ मे रोजी होणार होता. मात्र, पावसामुळे त्या दिवशी नाणेफेक होऊ शकली नाही आणि सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला. म्हणजेच बीसीसीआयने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला होता. राखीव दिवशीही पाऊस पडला, पण रात्री उशिरा सामना संपला आणि २०२३ चा विजयी संघ आपल्याला मिळाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Reserve Day for WTC final 2023


आयपीएलनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ ते ११ जून दरम्यान आणखी एक मोठा अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही फायनल आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. साहजिकचं चाहत्यांचा मनात हा प्रश्न तर येणारचं की या अंतिम लढतीत जर पावसाने हजेरी लावली तर राखीव दिवस आहे का आणि विजयी संघ कसा ठरणार जाणून घ्या.

काय आहे नियम

टी-२० आणि एकदिवसीय सारख्या मोठ्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवला जातो तर डब्ल्यूटीसी फायनलसाठीही असेच काहीसे आहे. कारण कसोटी सामना हा पाच दिवस खेळवला जातो. कसोटी क्रिकेटला रोमांचक बनवण्यासाठी आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू केली आहे. अशा परिस्थितीत पाच दिवस चालणाऱ्या या अंतिम सामन्यासाठी आयसीसीकडून राखीव दिवसाची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे, अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी पाऊस पडला आणि त्याचा निकालावर परिणाम झाला, तर सामना एका दिवसाने पुढे ढकलण्यात येईल. आयसीसीने २०२१ मध्येच एक प्रकाशन जारी करून याची घोषणा केली होती.


या नियमानुसार, राखीव दिवशीही षटकांचा पूर्ण दिवसाचा कोटा टाकला जाईल आणि अंतिम सामन्याचा निकाल मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील जेणेकरून चॅम्पियनची निवड करता येईल. दुसरीकडे, अंतिम सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख