अ‍ॅपशहर

राजू भालेकर यांचे निधन

महाराष्ट्राच्या रणजी संघाचे माजी कर्णधार राजेंद्र उर्फ राजू भालेकर (वय ६६) यांचे शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी आणि नात असा परिवार आहे. ६ एप्रिलला त्यांच्यावर दुसऱ्यांदा 'बायपास' झाली होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या फेल झाल्या होत्या.

Maharashtra Times 15 Apr 2018, 5:00 am
पुणेः महाराष्ट्राच्या रणजी संघाचे माजी कर्णधार राजेंद्र उर्फ राजू भालेकर (वय ६६) यांचे शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी आणि नात असा परिवार आहे. ६ एप्रिलला त्यांच्यावर दुसऱ्यांदा 'बायपास' झाली होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या फेल झाल्या होत्या. रविवारनंतर प्रकृती खालावली होती. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, सदानंद मोहोळ, महाराष्ट्राचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, सुरेंद्र भावे, शंतनू सुगवेकर, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhalekar


मधल्या फळीतील फलंदाज भालेकर यांनी आपल्या कारकीर्दीत ७४ सामन्यांत ३९.१६च्या सरासरीने सात शतके आणि १८ अर्धशतकांसह ३८७७ धावा केल्या. क्रिकेट अन् विशेषत: महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी ते नेहमी भरभरून बोलायचे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून महाराष्ट्राच्या क्रिकेटला योगदान देण्यासाठी ते कायम उत्सुक असायचे. त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच, ते रणजी संघाच्या निवड समितीचे सदस्यही होते. सध्या ते पीवायसी हिंदू जिमखान्याच्या क्रिकेट विभागाच्या सचिवपदी कार्यरत होते. 'महाराष्ट्रात फलंदाजी आणि गोलंदाजीला अधिक महत्त्व दिले जात होते. मात्र, भालेकर यांनी कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यानंतर क्षेत्ररक्षणाचेही महत्त्व पटवून दिले. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्र संघाच्या क्षेत्ररक्षणातही सुधारणा झाली,' अशा शब्दांत महाराष्ट्राचे माजी कर्णधार गुंजाळ यांनी भालेकर यांना श्रद्धांजली वाहिली.

'ते नेहमी खेळाडूंना समजून घेत; खेळाडूंत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करत. महाराष्ट्राच्या क्रिकेटला त्यांनी मोठे योगदान दिले. तसेच, ते खेळाला योगदान देण्यासाठी कायम उत्सुक असायचे,' अशा शब्दांत माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज