अ‍ॅपशहर

न्यूझीलंडला ऐतिहासिक संधी

भारत-न्यूझीलंडदरम्यानच्या मालिकेतील पाचवी आणि अंतिम वन-डे क्रिकेट लढत आज (शनिवार) रंगणार आहे. मालिकेत सध्या २-२ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे आजच्या वन-डे लढतीला फायनलचे स्वरुप आले आहे.

Maharashtra Times 29 Oct 2016, 4:00 am
भारताशी ‘फायनल’; आज पाचवी निर्णायक वनडे लढत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india newzealand final
न्यूझीलंडला ऐतिहासिक संधी


वृत्तसंस्था, विशाखापट्टणम

भारत-न्यूझीलंडदरम्यानच्या मालिकेतील पाचवी आणि अंतिम वन-डे क्रिकेट लढत आज (शनिवार) रंगणार आहे. मालिकेत सध्या २-२ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे आजच्या वन-डे लढतीला फायनलचे स्वरुप आले आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये भारतात आतापर्यंत ३१ वन-डे सामने खेळले गेले आहेत. यातील २३ सामने भारताने जिंकले असून, ७ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. यातील एक लढत अनिर्णित राहिली आहे. न्यूझीलंडला भारतात भारताविरुद्ध एकदाही वन-डे मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे ऐतिहासिक मालिका विजयाची किवी संघाला संधी आहे. या मैदानावर भारतीय संघ पाच वन-डे सामने खेळला आहे. यातील चार वन-डे भारताने जिंकल्या असून, एक लढत गमावली आहे. या अंतिम लढतीत भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वगुणाची कसोटी लागणार आहे. दुसरीकडे भारतात प्रथमच वन-डे मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी केन विल्यमसनच्या संघाला आहे. त्यामुळे एक रंगतदार लढत क्रिकेटप्रेमींना बघायला मिळणार आहे.

कसोटी मालिकेतील पराभव विसरून न्यूझीलंडच्या संघाने वन-डे मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले आहे. पहिली वन-डे भारताने सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडने चिवट लढा देऊन बरोबरी साधली. तिसऱ्या वन-डेत कोहलीच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. मात्र, चौथ्या वन-डेत लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीचा संघ अपयशी ठरला आणि ही लढत जिंकून न्यूझीलंडने बरोबरी साधली.

धोनीची कसोटी

धोनीला आपल्या घरच्या मैदानावर खेळताना पराभव पत्करावा लागला. यातच मायदेशात मालिका गमावली, तर धोनीवर निश्चितच टीका होईल. फिनिशरची भूमिका पार पाडणे सर्वांत कठीण असते, हे धोनीने मान्य केले. त्यातच गेल्या काही सामन्यांत आपण स्ट्राइक रोटेट करण्याची क्षमता गमावत चाललो होतो, असे धोनीने स्पष्ट केले होते. रांचीत तर धोनीला ३१ चेंडूंत केवळ ११ धावा करता आल्या होत्या. त्यातच धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशातील वन-डे मालिका गमावली. दक्षिण आफ्रिकेने भारतात येऊन भारताला पराभूत केले. ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियासमोर शरणागती पत्करली. त्यामुळे न्यूझीलंडने ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यास धोनीवर हल्लाबोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संघासाठी ही लढत जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच धोनीसाठी देखील. कारण पुढे इंग्लंड संघाविरुद्धची वन-डे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आहे. तेव्हा संघाचा आत्मविश्वास प्रबळ असणे गरजेचे आहे.

सलामीची चिंता

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत असलेल्या धोनीमुळे मधल्या फळीला अधिक जबाबदारीने खेळायला हवे. मनीष पांडे, केदार जाधव यांना या मालिकेद्वारे सुवर्णसंधी मिळाली आहे. त्यांनी फलंदाजीचा भार उचलायला हवा. भारताला चिंता आहे ती सलामी जोडीची. खासकरून रोहित शर्माची. रोहित या मालिकेत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने ११, १३, १५, १४ अशा धावा केल्या आहेत. भारताचा संघ विराट कोहलीवर अधिक अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. या मालिकेतील ज्या दोन वन-डे भारताने जिंकल्या आहेत, त्यात कोहलीने अनुक्रमे नाबाद ८५ आणि नाबाद १५४ धावांची खेळी केली आहे. त्यामुळे एकट्या कोहलीवर अवलंबून राहून भारताला विजय मिळवणे अशक्य होईल. गोलंदाजीत अमित मिश्रा आणि पार्ट टाइम फिरकी गोलंदाज केदार जाधवने चांगली कामगिरी केली आहे. अक्षर पटेल, हार्दिक पंड्या यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. जसप्रीत बुमराह तंदुरुस्त झाला असल्याने अंतिम लढतीत तो खेळेल.

दुसरीकडे, मालिका जिंकण्याची न्यूझीलंडला चांगली संधी आहे. विशेष म्हणजे या लढतीचे दडपण त्यासंघावर नाही. सलामीवीर मार्टिन गप्टील फॉर्मात आल्याने संघ आनंदात आहे. टॉम लॅथम धडाकेबाज खेळतो आहे. गोलंदाजही प्रभावी मारा करीत आहेत.

लढतीवर पावसाचे सावट

मालिकेतील पाचवी वन-डे विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये होत आहे. विशाखापट्टणमला ‘कँट’ वादळ धडकण्याची शक्यता होती. मात्र, हे वादळ खोल समुद्रातच विरट झाले. असे असले तरी शुक्रवारी हलक्या स्वरुपाचा, तर शनिवारी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे या लढतीला पावसाचा फटका बसू शकतो. क्युरेटरनी मात्र ८० टक्के आउटफिल्ड झाकून ठेवले असल्याचे सांगितले आहे. पावसाचा खेळपट्टीला फटका बसला नसून, खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम असून, चेंडूला चांगली उसळीही मिळेल, असे क्युरेटरनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज