अ‍ॅपशहर

शामी शायनिंग, टीम इंडिया 'डाव' साधणार?

दुखापतीतून सावरून तब्बल १८ महिन्यांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलेल्या मोहम्मद शामीनं काल अँटिगा कसोटीत चमकदार कामगिरी करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. ६६ धावांत ४ विकेट घेत शामीनं वेस्ट इंडिजची मधली फळी मोडून काढली.

Maharashtra Times 24 Jul 2016, 1:43 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अँटिगा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india tighten screws on west indies
शामी शायनिंग, टीम इंडिया 'डाव' साधणार?


दुखापतीतून सावरून तब्बल १८ महिन्यांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलेल्या मोहम्मद शामीनं काल अँटिगा कसोटीत चमकदार कामगिरी करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. ६६ धावांत ४ विकेट घेत शामीनं वेस्ट इंडिजची मधली फळी मोडून काढली, तर उमेश यादवनं ४१ धावांत ४ जणांना माघारी धाडलं. त्यांच्या तिखट माऱ्यामुळेच यजमानांवर 'फॉलो ऑन' लादून टीम इंडियानं विजयपथावर वाटचाल सुरू केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात विंडीजची अवस्था १ बाद २१ अशी होती. ते अजून ३०२ धावांनी पिछाडीवर असल्यानं टीम इंडियाला डावाच्या विजयाची नामी संधी आहे.

अँटिगा कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ५६६ धावांचा डोंगर उभारून टीम इंडियानं आपला डाव घोषित केला होता. त्यानंतर, विंडीजची सुरुवातच अडखळती झाली होती. १ बाद ३१ या धावसंख्येवरून त्यांनी तिसऱ्या दिवसाच्या खेळ सुरू केला. सलामीवर क्रेग ब्रॅथवेट आणि नाइट वॉचमन देवेंद्र बिशू यांनी १५ ओव्हर सावधपणे खेळून काढल्या. पण, ही जोडी तुटली आणि मग मानसिक दबाव आणि शामी - यादवच्या भेदक गोलंदाजीपुढे यजमानांनी नांगी टाकली. ब्रॅथवेट (७४ धावा) वगळता कुणीच पीचवर फार काळ टिकू शकलं नाही. ठरावीक अंतराने विंडीजच्या विकेट जात राहिल्या आणि यजमानांचा पहिला डाव २४३ धावांवर आटोपला. स्वाभाविकच, ३२३ धावांनी पिछाडीवर असलेल्या विंडीजला कर्णधार विराट कोहलीनं 'फॉलो ऑन' दिला.

त्यानंतर, दुसऱ्या डावातही विंडीजची सुरुवात खराबच झाली आहे. त्यांचा भरवशाचा शिलेदार ब्रॅथवेट दोन धावा करून तंबूत परतला आहे. त्यांचे नऊ शिलेदार अजून शिल्लक असले, तरी ३०२ धावांची पिछाडी भरून काढण्याचं आव्हान त्यांना कितपत पेलवेल, याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे कसोटीच्या चौथ्या दिवशीच विंडीजला गुंडाळून मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याच्या इराद्यानेच विराटसेना मैदानावर उतरणार असून गोलंदाजांकडून पुन्हा एकदा चोख कामगिरीची संघाला अपेक्षा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज