अ‍ॅपशहर

ऑस्ट्रेलियापुढे विराटसेना गडगडली

ऑस्ट्रेलियाला २६० धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाचं पारडं जड वाटू लागलं असतानाच, स्टीव्ह ओकिफेच्या फिरकीपुढे भारताच्या रथी-महारथींनी गिरकी घेतली आणि पहिल्या डावात १०५ धावांवरच विराटसेनेचा खेळ खल्लास झाला.

Maharashtra Times 24 Feb 2017, 2:56 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 35 as india crash for 105
ऑस्ट्रेलियापुढे विराटसेना गडगडली


ऑस्ट्रेलियाला २६० धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाचं पारडं जड वाटू लागलं असतानाच, स्टीव्ह ओकिफेच्या फिरकीपुढे भारताच्या रथी-महारथींनी गिरकी घेतली आणि पहिल्या डावात १०५ धावांवरच विराटसेनेचा खेळ खल्लास झाला. के एल राहुल वगळता टीम इंडियाचा एकही वीर कांगारू गोलंदाजीपुढे टिकाव धरू शकला नाही.

भारत vs ऑस्ट्रेलिया स्कोअरकार्ड

पहिल्या दोन विकेट पडल्यानंतर पुढच्या ३०-४० धावांत अख्खा संघ गडगडला, हे चित्र भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी नवं नाही. सचिन तेंडुलकरच्या काळात तर अनेक सामने भारतानं असेच गमावलेत. पण, गेल्या काही वर्षांत टीम इंडियानं 'अवसानघातकी' हा शिक्का पुसून टाकलाय. उलट, झुंजार, जिगरबाज अशी आपली ओळख धोनीसेनेनं निर्माण केली आणि हाच वारसा विराटसेना पुढे नेतेय. पण आज पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्यापुढे टीम इंडियाची पार दाणादाण उडाली.

भारताच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हतीच. मुरली विजयच्या रूपाने कोहली कंपनीला पहिला धक्का बसला. पण, या धक्क्यातून ते सावरणारच नाहीत, असं कुणालाच वाटलं नव्हतं. राहुल आणि चेतेश्वर पुजारा हळूहळू सेट होत होते, पण स्टार्कनं पुजारा आणि पाठोपाठ विराट कोहलीला तंबूत धाडलं आणि उरलेलं काम स्टीव्ह ओकिफेनं तमाम केलं. अजिंक्य रहाणे आणि राहुलची जोडी त्यानंच फोडली आणि ४ बाद ९४ वरून टीम इंडियाचा डाव १०५ धावांवर आटोपला.

स्टीव्ह ओकिफेनं ३५ धावांत ६ विकेट घेतल्या. विशेष म्हणजे, अवघ्या २५ चेंडूत त्यानं या सहा जणांना तंबूचा रस्ता दाखवला. टीम इंडियाच्या शेवटच्या सात विकेट ११ धावांत पडल्या. वृद्धिमान साहा, अश्विन, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, उमेश यादव यांनी केवळ हजेरी लावली आणि भारतीय क्रिकेटप्रेमींना जुने दिवस आठवले.

भारताच्या या भंबेरीमुळे ऑस्ट्रेलियानं १५५ धावांची आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या डावात त्यांना लवकरात लवकर गुंडाळण्याचं मोठं काम भारतीय गोलंदाजांना करावं लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज