अ‍ॅपशहर

सातवा मालिकाविजय

भारताने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला ८ विकेटनी पराभूत केले आणि चार सामन्यांची बॉर्डर- गावसकर ट्रॉफी मालिका २-१ अशी जिंकली. हा भारताचा सलग सातवा मालिका विजय ठरला.

Maharashtra Times 29 Mar 2017, 4:00 am
वृत्तसंस्था, धरमशाला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india win series against australia
सातवा मालिकाविजय


भारताने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला ८ विकेटनी पराभूत केले आणि चार सामन्यांची बॉर्डर- गावसकर ट्रॉफी मालिका २-१ अशी जिंकली. विराट कोहलीच्या गैरहजेरीत कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अजिंक्य रहाणेने पॅट कमिन्सचा ताशी १४६ किलोमीटर वेगाने येणारा बाउन्सर मिडविकेटला भिरकावला. पुन्हा पुढच्या चेंडूवर त्याने कव्हरच्या दिशेने षटकार खेचला. येथेच सारे काही स्पष्ट झाले. भारताचा हा सातवा कसोटी मालिका विजय ठरला. याआधी, भारताने २०१५ पासून श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, इंग्लंड व बांगलादेश यांना पराभूत केले होते.

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या लढतीत भारताचा विजय तिसऱ्याच दिवशी निश्चित झाला होता. भारतासमोर १०६ धावांचे लक्ष्य होते आणि तिसऱ्या दिवसअखेर भारताने बिनबाद १९ धावा केल्या होत्या. विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी भारताला अवघ्या ८७ धावांची गरज होती.

जोश हॅझलवूडच्या पहिल्याच षटकात मुरली विजयविरुद्ध दोन वेळा अपील करून ऑस्ट्रेलियाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकेश राहुलवर (५१) या दबावाचा परिणाम झाला नाही. त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी केली. स्टीफन ओकीफला दोन चौकार ठोकून त्याने ऑस्ट्रेलियाला संधी नसल्याचे दाखवून दिले.

पॅट कमिन्सने मुरली विजयला बाद करून ही जोडी फोडली. त्या वेळी भारताने ४६ धावा फलकावर लावल्या होत्या आणि विजयासाठी ६० धावांची गरज होती. याच षटकात चेतेश्वर पुजारा धावबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे चेहरे खुलले होते. पण रहाणेने कमिन्सला सलग दोन चौकार ठोकून आपले मनसुबे स्पष्ट केले. यानंतर रहाणेने कमिन्सला सलग दोन षटकार खेचून विजयाची औपचारिकता लवकर पूर्ण करायची असल्याचे दाखवून दिले. एकीकडे भारताला विजयासाठी चार धावांची गरज असताना लोकेश राहुलच्या अर्धशतकाला दोन धावांची गरज होती. राहुलने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. रहाणेने पुढच्या चेंडूवर एक धाव घेऊन राहुलला अर्धशतक पूर्ण करण्याची संधी दिली. त्याने ओकीफच्या चेंडूवर दोन धावा घेऊन अर्धशतकही पूर्ण केले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तबही केले. यावेळी राहुलचा जल्लोष बघण्यासारखा होता. लोकेश राहुल-रहाणे जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची अभेद्य भागीदारी केली. राहुलने ७६ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ५१, तर रहाणेने २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. खांद्याच्या दुखापतीमुळे विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. त्यामुळे पूर्ण वेळ कर्णधार म्हणून रहाणेची ही पहिलीच कसोटी होती. पहिल्याच कसोटीत त्याने आपल्या नेतृत्वगुणाची छाप पाडली.

स्कोअरबोर्ड

ऑस्ट्रेलिया : पहिला डाव – सर्वबाद ३००.

भारत : पहिला डाव – सर्वबाद ३३२.

ऑस्ट्रेलिया : पहिला डाव – सर्वबाद १३७.

भारत : दुसरा डाव – लोकेश राहुल नाबाद ५१, मुरली विजय झे. वेड गो. कमिन्स ८, चेतेश्वर पुजारा धावबाद ०, अजिंक्य रहाणे नाबाद ३८, अवांतर -९; एकूण – २३.५ षटकांत २ बाद १०६. बाद क्रम : १-४६, २-४६.

गोलंदाजी : पॅट कमिन्स ८-२-४२-१, जोश हॅझलवूड ६-२-१४-०, स्टीफन ओकीफ ४.५-१-२२-०, नॅथन लायन ५-०-१९-०.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज