कोलंबो : श्रीलंका युवा संघाने अष्टपैलू कामगिरी करून १९ वर्षांखालील गटाच्या वन-डे क्रिकेट सामन्यात भारतावर पाच विकेटनी सहज मात केली. या विजयासह श्रीलंकेने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय युवा संघाचा डाव ४७ षटकांत १९३ धावांत आटोपला. यात पुण्याच्या पवन शहाने ६४ चेंडूंत ६ चौकारांसह सर्वाधिक ४९ धावा केल्या. आयुष बदोनीने ५० चेंडूंत ३६ धावा जोडल्या. त्याला समीर चौधरी आणि अजय देव गौडची चांगली साथ मिळाली. यानंतर श्रीलंकेने विजयी लक्ष्य ४५.४ षटकांत ५ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात निपून परेराने ११२ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ९२, तर सूरियाबांदराने ७१ चेंडूंत ५ चौकारांसह ५२ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : भारत - ४७ षटकांत सर्वबाद १९३ (पवन शहा ४९, आयुष बदोनी ३६, समीर चौधरी ३२, अजय देव गौड २४, दुलशान ३-२७, फर्नांडो २-१७, मानसिंघे २-३९, परनवितना २-२७) पराभूत वि. श्रीलंका - ४५.४ षटकांत ५ बाद १९५ (परेरा नाबाद ९२, सूरियाबांदरा ५२, अजय देव गौड २-३२, देसाई २-३१).