म. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर
स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरच्या (एसजेएएन) वतीने व ओसीडब्लू व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने २१ व्या आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेला गुरुवार, १० जानेवारीपासून सकाळी ८.३० वाजता डॉ. आंबेडकर कॉलेजच्या मैदानावर सुरुवात होईल.
याप्रसंगी ओसीडब्लूचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोय रॉय, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक फनीश गुप्ता आणि मोहन चांगदे, नागपूर मनपाचे नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे सभापती विक्की कुकरेजा, विदर्भ रणजी संघाचा माजी कर्णधार प्रीतम गंधे, माजी रणजीपटू हेमंत वसू आणि क्रीडा संघटक अनिल अहिरकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. स्पर्धेची उद्घाटनीय लढत गतविजेता हितवाद व टाइम्स ऑफ इंडिया-महाराष्ट्र टाइम्स यांच्यात होईल. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात गेल्या १५ वर्षांपासून सलग आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच एसजेएएनच्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या क्रिक मीडिया मासिकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.
या स्पर्धेनिमित्त मंगळवारी एका कार्यक्रमात खेळाडूंना किट्सचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ओसीडब्लूचे संचालक केएमपी सिंग, हेमंत वसू, नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव मंगेश काशीकर, सेंट पॉल शाळेचे राजाभाऊ टांकसाळे आणि साऊथ पॉइंट स्कूलचे देवेन दस्तुरे उपस्थित होते.
....