अ‍ॅपशहर

IPL २०२२ मध्ये दिसणार नाहीत 'हे' स्टार खेळाडू; लिलावासाठी १२१४ खेळाडूंची झाली नोंदणी

गेल्या मोसमात ख्रिस गेलने हंगाम पूर्ण होण्यापूर्वीच पंजाब किंग्जला सोडचिठ्ठी दिली होती. याशिवाय जो रुटही पहिल्यांदाच आयपीएलमध्ये दिसणार नाही. तर स्टोक्स आणि आर्चर सलग दुसरा हंगाम गमावू शकतात, असेही आता समोर आले आहे.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 22 Jan 2022, 7:06 pm
IPL 2022 : नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) चा १५ व्या हंगामासाठी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव होणार आहे. या मेगा लिलावासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश नसल्याचे दिसून आले आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, जो रूट आणि मिचेल स्टार्कसारखे स्टार खेळाडू यंदा होणाऱ्या आयपीएलमध्ये दिसणार नाहीत. या लिलावासाठी एकूण १२१४ खेळाडूंची नोंदणी झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आयपीएल २०२२


इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट याने आधीच स्पष्ट केले होते की, तो इंग्लंड आणि कसोटी क्रिकेटसाठी आयपीएलचा त्याग करणार आहे, पण स्टोक्स आणि आर्चरची अनुपस्थिती सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी आहे. सुमारे १२१४ खेळाडूंची पहिली यादी शुक्रवारी (२१ जानेवारी) रात्री लिलावासाठी आयपीएल फ्रँचायझींसोबत शेअर करण्यात आली.

जगातील अनेक महान खेळाडूंनी त्यांच्या उपस्थितीवर सहमती दर्शवली आहे. पॅट कमिन्स (बेस प्राइज- २ कोटी), डेव्हिड वॉर्नर (बेस प्राइज- २ कोटी), स्टीव्ह स्मिथ (बेस प्राइज- २ कोटी), ड्वेन ब्राव्हो (बेस प्राइज - २ कोटी), क्विंटन डी कॉक (बेस प्राइज - २ कोटी) , फाफ डू प्लेसिस (बेस प्राइज - २ कोटी) आणि मार्क वुड (बेस प्राइज - २ कोटी). वुड गेल्या हंगामात खेळला नव्हता.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (बेस प्राइज - २ कोटी), लुंगी एनगिडी (बेस प्राइज - ५० लाख) आणि मार्को जनसेन (बेस प्राइज - ५० लाख) देखील मेगा लिलावात उपलब्ध असतील. मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होणार होता, पण कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे हा लिलाव पुढे ढकलण्यात आला.

मेगा लिलावासाठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी ८९६ भारतीय आणि ३१८ परदेशी आहेत. याशिवाय या यादीत फक्त २७० खेळाडू आहेत, ज्यांना कॅप आहे. ९०३ खेळाडू अनकॅप्ड आहेत, तर ४१ खेळाडू नेपाळ, यूएई, ओमान, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स सारख्या सहयोगी देशांतील आहेत. या यादीत अमेरिकेच्या १४ खेळाडूंचाही समावेश आहे.

महत्वाचे लेख