अ‍ॅपशहर

IPL 2021 : चेन्नईच्या गोलंदाजीपुढे पंजाबचे लोटांगण, दीपक चहर ठरला कर्दनकाळ

चेन्नईच्या गोलंदाजांनी यावेळी भेदक गोलंदाजी करत पंजाब किंग्सच्या फलंदाजांना आपल्यापुढे शरणागती पत्करण्यास भाग पाडले. वेगवान गोलंदाज दीपक चहर यावेळी पंजाबसाठी कर्दनकाळ ठरला. कारण त्याने चार विकेट्स घेत पंजाबचे कंबरडे मोडले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Apr 2021, 8:57 pm
मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांपुढे पहिल्या सामन्यात दोनशे धावांचा टप्पा गाठणाऱ्या पंजाब किंग्स संघाने लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या गोलंदाजीपुढे पंजाबचे नावाजलेले फलंदाज झटपट बाद झाले आणि त्यांची ५ बाद २६ अशी बिकट अवस्था झाली होती. त्यामुळे पंजाबला या सामन्यात धोनीच्या चेन्नईपुढे १०७ धावांचे माफक आव्हान ठेवता आले आहे. पंजाबच्या संघासाठी यावेळी चार विकेट्स पटकावणारा दीपक चहर हा कर्दनकाळ ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण त्याच्या गोलंदाजीपुढे पंजाबचे फलंदाज हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम चेन्नई सुपर किंग्स (सौजन्य-आयपीएल ट्विटर)


चेन्नईच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली आणि त्यांनी पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. चेन्नईच्या गोलंदाजांनी कर्णधार धोनीचा हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण वेगवान गोलंदाज दीपक चहरने पहिल्याच षटकात मयांक अगरवालला बाद केले, त्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. मयांक पहिल्या सामन्यातही लवकर बाद झाला होता.

दीपकने यावेळी मयांकनंतर ख्रिस गेल, दीपक हुडा आणि निकोलस पुरन यांनाही बाद करत पंजाबचे कंबरडे मोडले. त्याचबरोबर कर्णधार लोकेश राहुलला यावेळी फक्त १० धावांवर समाधान मानावे लागले आणि धावचीत होत त्याने आत्मघात केला. पण त्यानंतर पंजाबच्या संघातील युवा फलंदाज शाहरुख खानने पंजाबला तारले आणि त्याच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

पंजाबसाठी यावेळी कर्दनकाळ ठरला तो दीपक चहर. कारण दीपकने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पंजाबची फलंदाजी खिळखिळी करून टाकली. गेल, हुडा, अगरवाल आणि पुरन यांना बाद करत त्याने पंजाबच्या संघाला एकामागून एक हादरे दिले आणि त्यामधून पंजाबचा संघ सावरू शकला नाही. चहरने यावेळी चार षटकांमध्ये फक्त १३ धावा देत चार फलंदाजांना तंबूत धाडले. त्याचबरोबर त्याने एक षटक निर्धावही टाकले.दीपकला यावेळी सॅम करन, रवींद्र जडेजा, मोइन अली आणि ड्वेन ब्राव्हो यांची चांगली साथ मिळाली. अली आणि ब्राव्हो यांनी यावेळी विकेट्सही पटकावल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज