अ‍ॅपशहर

CSK vs MI : आवाज कोणाचा ऋतुराजचा, चेन्नईचा मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात मोठा धक्का

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने कठीण परिस्थिती असतानाही दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आणि तोच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यामुळेच आज चेन्नईला मुंबई इंडियन्सवर दमदार विजय मिळवता आला.

Maharashtra Times 20 Sep 2021, 8:09 am
दुबई : चेन्नई सुपर किंग्सची ४ बाद २४ अशी अवस्था असताना मराठमोठा ऋतुराज गायकवाड मैदानात एकटा मुंबई इंडियन्सला भिडल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराजच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईच्या संघाने १५६ धावा उभारल्या होत्या. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईने यावेळी २० धावांनी मुंबई इंडियन्सवर विजय साकारला. ऋतुराजने यावेळी ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ८८ धावांची खेळी साकारली होती. ड्वेन ब्राव्होने यावेळी तीन विकेट्स मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ऋतुराज गायकवाड (सौजन्य-ट्विटर)


मुंबई इंडियन्सपुढे १५७ हे काही मोठे आव्हान नव्हते. पण चेन्नईच्या गोलंदाजांनी यावेळी भेदक मारा केला आणि मुंबईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. त्यामुळे चेन्नईच्या संघाला हा विजय साकारता आला.

मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे पहिल्याच पॉवर प्लेमध्ये दाखवून दिले. पहिल्याच षटकात मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने चेन्नईचा सलामीवीर फॅफ ड्यु प्लेसिसला बाद केले आणि चेन्नईला पहिला धक्का दिला. फॅफला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर अॅडम मिल्नेने दुसऱ्याच षटकात मोइन अलीला बाद केले आणि चेन्नईची २ बाद २ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर चेन्नईचा अंबाती रायुडू दुखापतग्रस्त झाला आणि त्यालाही मैदान सोडावे लागले. चेन्नईला यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण या दोघांनाही बोल्ट आणि मिल्ने जोडीने बाद केले. धोनीला यावेळी ३ तर रैनाला फक्त चार धावांवरच समाधान मानावे लागले. त्यावेळी चेन्नईची सहा षटकांमध्ये ४ बाद २४ अशी अवस्था झाली होती. यावेळी ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या संघाला सारवल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराजने सुरुवातीला संथ सुरुवात केली असली तरी त्यानंतर त्याने धावा जमवायला सुरुवात केली. ऋतुराजने यावेळी अर्धशतक झळकावत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न केला. ऋतुराजला यावेळी रवींद्र जडेजाकडून चांगली साथ मिळाल्याचे पाहायला मिळाले.

महत्वाचे लेख