अ‍ॅपशहर

IPL 2021 : आरसीबीने गुणतालिकेत धोनीच्या चेन्नईचा दिला मोठा धक्का, पटकावले मानाचे स्थान...

आरसीबीच्या संघाने यावेळी फक्त दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला नाही तर त्यांनी धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सच्या संघालाही धक्का दिला आहे. त्यामुळे आरसीबीच्या संघाने गुणतालिकेत मानाचे स्थान पटकावले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2021, 11:36 pm
अहमदाबाद : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने आज दिल्ली कॅपिटल्सवर अखेरच्या चेंडूवर फक्त एका धावेने विजय मिळवला. आरसीबीने एका धावेने विजय मिळवला असली तरी त्यांनी गुणतालिकेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला धक्का दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आरसीबी (सौजन्य-आयपीएल ट्विटर)


आरसीबीचा या हंगामातील हा पाचवा विजय होता. आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये त्यांनी पाच विजय मिळवले असून त्यांच्या खात्यात १० गुण जमा झाले आहेत. या १० गुणांसह आरसीबीच्या संघाने गुणतालिकेत चेन्नईला धक्का देत अव्वल स्थान पटकावले आहे. या आयपीएलमध्ये पहिल्यांदा १० गुण पटकावण्याचा मानही आरसीबीने पटकावला आहे. त्याचबरोबर चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर असून दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

आरसीबीच्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला सुरुवातीलाच शिखर धवन आणि स्टीव्हन स्मिथ यांच्या पुरात दोन मोठे धक्के बसले. त्यावेळी पृथ्वी शॉ मात्र धडाकेबाज फलंदाजी करत होता, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पृथ्वीला यावेळी २१ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांच्यामध्ये ७८ धावांची अभेद्य भागीदारी पाहायला मिळाली. पण या दोघांनी फटकेबाजी करूनही दिल्लीच्या संघाला फक्त एका धावेने पराभव पत्करावा लागला.

दिल्लीच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली आणि आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी दिल्लीचा वेगवान गोलंदाज अव्हेश खानने यावेळी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आपल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आजच्या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या इशांत शर्माने देवदत्त पडीक्कलला बाद केले आणि दिल्लीला दुसरे यश मिळवून दिले.

आरसीबीने कोहली आणि पडीक्कल या दोघांनाही गमावल्यावर ग्लेन मॅक्सवेलने काही काळ चांगली फलंदाजी केली. पण मॅक्सवेलला यावेळी अमित मिश्राने बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स खेळायला आला आणि त्याने सर्व समीकरणेच बदलून टाकली. एबीने यावेळी सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावा घेतल्या. पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्याने जोरदार फटकेबाजी केली. एबीने यावेळी दिल्लीच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केला. एबीने यावेळी ४२ चेंडूंत ३ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ७५ धावांची तुफानी खेळी साकारली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज