अ‍ॅपशहर

आयपीएलच्या प्रसारण हक्कांमध्ये रिलायन्स आणि स्टारची बाजी, ‘टाइम्स इंटरनेट’चाही सहभाग

आयपीएलच्या प्रसारण हक्कामधून बीसीसीआयला ४८ हजार ३९० कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. २०२३ ते २०२७ या पाच वर्षांसाठीच्या प्रसारण हक्काच्या ई-लिलावात ‘डिस्ने स्टार’ आणि ‘रिलायन्स व्हायकॉम-१८’ने बाजी मारली आहे. भारतीय उपखंडाबाहेरील लढतींचे प्रसारण हक्क व्हायकॉम-१८ आणि टाइम्स इंटरनेटने खरेदी केले. याची आधारभूत किंमत प्रत्येक लढतीसाठी तीन कोटी रुपये एवढी आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 14 Jun 2022, 11:48 pm
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लढतींच्या प्रसारण हक्कासाठीच्या लिलावातून भारतीय क्रिकेट बोर्डाला (बीसीसीआय) ४८ हजार ३९० कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रातील प्रसारण हक्कासाठीचा सर्वोत्तम करारांपैकी हा एक मानला जात आहे. २०२३ ते २०२७ या पाच वर्षांसाठीच्या प्रसारण हक्काच्या ई-लिलावात ‘डिस्ने स्टार’ आणि ‘रिलायन्स व्हायकॉम-१८’ने बाजी मारली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आयपीएल २०२२ (सौजन्य-ट्विटर)

बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले, ‘भारताने डिजिटल क्रांती पाहिली आहे आणि या क्षेत्रात अमर्याद क्षमता आहे. डिजिटल लँडस्केपमुळे क्रिकेट पाहण्याची पद्धत बदलली आहे. क्रिकेटच्या लढती वाढण्यामागे हा एक मोठा घटक कारणीभूत आहे. यातून आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू वाढली आहे. प्रत्येक लढतीच्या प्रसारण हक्कातून मिळणाऱ्या रकमेबाबत आयपीएल जगातील दुसरी सर्वोत्तम लीग ठरली आहे.’ पहिल्या दहा वर्षांसाठी (२००८ते २०१७) ‘सोनी’ने ८२०० कोटी रुपयांत प्रसारण हक्क खरेदी केले होते. यानंतर २०१८च्या लिलावात प्रसारण हक्कासाठी ‘स्टार’ने १६ हजार ३४७ कोटी रुपये मोजले होते.

‘व्हायकॉम-१८’ची बाजी
भारतीय उपखंडातील काही मोजक्या आणि महत्त्वाच्या लढतींचे टीव्ही प्रसारण हक्क (पॅकेज सी) ‘व्हायकॉम-१८’ने २९९१.६ कोटी रुपयांत खरेदी केले. यातून प्रत्येक लढतीसाठी बीसीसीआयला ३३.२४ कोटी रुपये मिळणार आहे. प्रत्येक वर्षी अशा अठरा लढती म्हणजे पाच वर्षांत ९० लढतींचा या पॅकेजमध्ये समावेश आहे.

‘टाइम्स इंटरनेट’चा सहभाग
भारतीय उपखंडाबाहेरील लढतींचे प्रसारण हक्क व्हायकॉम-१८ आणि टाइम्स इंटरनेटने खरेदी केले. याची आधारभूत किंमत प्रत्येक लढतीसाठी तीन कोटी रुपये आहे. हा करार १३०० कोटी रुपयांहून अधिकचा आहे.

खेळ आकड्यांचा...
२३५७५ - ‘डिस्ने स्टार’ने भारतीय उपखंडातील टीव्ही प्रसारण हक्क २३ हजार ५७५ कोटी रुपयांत खरेदी केले. म्हणजे बीसीसीआयला प्रत्येक लढतीसाठी ५७.५ कोटी रुपये मिळणार आहेत.
२०५०० - ‘रिलायन्स व्हायकॉम-१८’ने भारतीय उपखंडातील डिजिटल प्रसारण हक्क २० हजार ५०० कोटी रुपयांत खरेदी केले. म्हणजे बीसीसीआयला प्रत्येक लढतीसाठी ५० कोटी रुपये मिळतील.
४१० - या पाच वर्षांत आयपीएलच्या एकूण ४१० क्रिकेट लढती होणार आहेत.

असे होते पॅकेज
पॅकेज ए - भारतीय उपखंडातील टीव्ही प्रसारण हक्क (सर्व लढती)
पॅकेज बी - भारतीय उपखंडातील डिजिटल प्रसारण हक्क (सर्व लढती)
पॅकेज सी - भारतीय उपखंडातील टीव्ही प्रसारण हक्क (मोजक्याच लढती)
पॅकेज डी - भारतीय उपखंडाबाहेरील लढतींचे प्रसारण हक्क (सर्व लढती)

जगातील सर्वोत्तम पाच लीग
(प्रसारण हक्कातून प्रत्येक लढतीसाठी मिळणारा पैसा)
एनएफएल - १३३ कोटी रुपये
आयपीएल - ११८ कोटी रुपये
ईपीएल - ८६ कोटी रुपये
एमएलबी - ८६ कोटी रुपये
एनबीए - १५.६ कोटी रुपये
(आयपीएल- इंडियन प्रीमियर लीग; एनएफएल - नॅशनल फुटबॉल लीग; एनबीए - अमेरिकेतील बास्केटबॉल लीग; ईपीएल - इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल आणि एमएलबी - मेजर लीग बेसबॉल).
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख