अ‍ॅपशहर

IPL मधील सर्वात घातक गोलंदाज; बुमराहने केला नवा विक्रम

आयपीएलच्या १३व्या हंगामात मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा ५७ धावांनी पराभव करून त्यांनी सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली. या सामन्यात मुंबईच्या जसप्रित बुमराहने नवा विक्रम केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2020, 3:28 pm
नवी दिल्ली: आयपीएलच्या क्वालिफायर १ च्या लढतीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५७ धावांनी पराभव करत सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत ५ बाद २०० धावा केल्या. त्यानंतर दिल्लीला १४३ धावात रोखले. या विजयात मुंबईच्या गोलंदाजांनी सर्वोत्तम अशी कामगिरी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम जसप्रित बुमराह (फोटो-आयपीएल)


दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईच्या जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) ने १४ धावा देत चार विकेट घेतल्या. यासह आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला आहे. स्पर्धेतील पर्पल कॅप आता बुमराहच्या डोक्यावर आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने कागिसो रबाडाला माग टाकले. रबाडाने आतापर्यंत २५ विकेट घेतल्या आहेत. तर बुमराहच्या २७ विकेट झाल्या आहेत.

वाचा- दिल्लीवरील विजयानंतर रोहित शर्माने सर्वांची मने जिंकली; पाहा काय केले

क्वालिफायर १ च्या लढतीत बुमराहने शिखर धवन, मार्कस स्टायनिस, श्रेयस अय्यर आणि डॅनियल सॅम्सला बाद केले. त्याने ४ ओव्हरमध्ये फक्त १४ धावा दिल्या आणि ४ विकेट घेतल्या. या कामगिरीसह बुमराहने एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.

वाचा- SRH vs RCB IPL 2020: आज कोणाचा पत्ता कट होणार? सनरायजर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स लढत

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी २०१७ साली बुमराहने २६ विकेट घेतल्या होत्या. तर २०१३ साली हरभजन सिंगने २४ विकेट तर २०१७ मध्ये जयदेव उनाडकटने २४ विकेट घेतल्या होत्या.

वाचा- फायनलच्या आधी मुंबई इंडियन्सला शॉक; या खेळाडूला झाली दुखापत

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आता बुमराहच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १०५ विकेट घेतल्या आहेत. या वर्षी मुंबईच्या ट्रेंट बोल्टने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या आहेत. बोल्टने काल पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथम पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेला बाद करून दिल्लीचा पराभव निश्चित केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज