अ‍ॅपशहर

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांत गेलला वगळले

आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे गेलला वन-डे मालिकेतूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'गुडबाय' करावे लागणार आहे. याचबरोबर विंडीजने १३ जणांच्या संघात 'वजनदार' अष्टपैलू राहकीम कॉर्नवॉल याला स्थान दिले आहे. भारत-विंडीजदरम्यानची पहिली कसोटी २२ ऑगस्टपासून खेळली जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स 11 Aug 2019, 6:58 am
वृत्तसंस्था, पोर्ट ऑफ स्पेन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम khris-gayle-maharashtratime


आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे गेलला वन-डे मालिकेतूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'गुडबाय' करावे लागणार आहे. याचबरोबर विंडीजने १३ जणांच्या संघात 'वजनदार' अष्टपैलू राहकीम कॉर्नवॉल याला स्थान दिले आहे. भारत-विंडीजदरम्यानची पहिली कसोटी २२ ऑगस्टपासून खेळली जाणार आहे.

वन-डे वर्ल्ड कपमध्येच गेलने भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. गेलचा टी-२० मालिकेत समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, वन-डेत त्याला स्थान देण्यात आले आहे. वन-डेतील पहिली लढत पावसामुळे अनिर्णित राहिली. आता उर्वरित दोन वन-डेत तो खेळणार. त्यामुळे १४ ऑगस्टला होणारी तिसरी वन-डे हा कदाचित त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. २१ सप्टेंबरला गेल ४० वर्षांचा होणार आहे. असेही गेल विंडीजकडून अखेरचा कसोटी सामना २०१४मध्ये खेळला आहे. त्याला निरोपाची कसोटी खेळण्याची संधी मिळेल, असे वाटले होते. वर्ल्ड कपदरम्यान त्याने तशी इच्छाही व्यक्त केली होती. मात्र, १०३ कसोटी सामन्यांचा अनुभव असणाऱ्या गेलला निरोपाची कसोटी मिळणार नाही, हे निवड समितीने स्पष्ट केले आहे.

'वजनदार' कॉर्नवॉलची चर्चा

विंडीज कसोटी संघात एका नव्या चेहऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. ६ फूट ६ इंच आणि १४० किलो वजनाचा राहकीम कॉर्नवॉल या २६ वर्षी अष्टपैलूला विंडीजने पदार्पणाची संधी दिली आहे. फिरकी गोलंदाज असलेला कॉर्नवॉलने ५५ फर्स्ट क्लास सामन्यांत २६० विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने २२२४ धावाही केल्या आहेत. २०१४मध्ये त्याने 'फर्स्ट क्लास' क्रिकेटचा श्रीगणेशा केला आहे. भारत 'अ'विरुद्ध खेळताना त्याने दोन अर्धशतके ठोकली आहेत. तंदुरुस्तीच्या कारणास्तव त्याचे विंडीज संघातील पदार्पण लांबले आहे.

विंडीज संघ : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामर्ह ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, राहकीम कॉर्नवॉल, शेन डॉवरिच (यष्टिरक्षक), शनॉन गॅब्रिएल, शिमरॉन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच.

पहिली कसोटी : २२ ते २६ ऑगस्ट - सर व्हिव्हियन रिचर्डस स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा.

दुसरी कसोटी : ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर - सबिना पार्क, किंग्जस्टन, जमैका

.......

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज