अ‍ॅपशहर

सर्वाधिक सफाईदार विजय

भारताने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत २०३ धावांनी मिळविलेला विजय हा आपल्या चार वर्षांच्या प्रशिक्षकपदाच्या काळातील सर्वाधिक सफाईदार विजय होता, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली.

Maharashtra Times 23 Aug 2018, 4:00 am
रवी शास्त्री यांचे मत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ravi-Shastri


नॉटिंगहॅम : भारताने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत २०३ धावांनी मिळविलेला विजय हा आपल्या चार वर्षांच्या प्रशिक्षकपदाच्या काळातील सर्वाधिक सफाईदार विजय होता, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली.

शास्त्री यांनी सांगितले की, लागोपाठ दोन पराभवानंतर संघातील खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर खेळाडूंनी त्याला अगदी उचित प्रतिसाद दिला.

शास्त्री म्हणाले की, भारतात आमच्याबद्दल काय लिहून आले, ते ठाऊक नाही. पण पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून आम्हाला निसटता पराभव स्वीकारावा लागल्याने मी निराश झालो. दुसऱ्या कसोटीत लॉर्डसवर आमचा धुव्वा उडाला त्यामुळे आम्हाला काहीतरी सिद्ध करून दाखवायचे होते. तुम्ही या सगळ्याची जबाबदारी स्वीकारा, असे मी त्यांना म्हटल्यावर त्यांनी त्याला अगदी अचूक प्रतिसाद दिला. तिन्ही आघाड्यांवर आम्ही यशस्वी ठरलो.

एक प्रशिक्षक म्हणून मी त्यापेक्षा अधिक अपेक्षा करू शकत नव्हतो. पण मला त्यांचा अभिमान आहे. ते ज्या पद्धतीने या आव्हानांपुढे उभे राहिले, संघर्ष केला आणि विजय मिळविला त्याचे कौतुक व्हायला हवे, असेही शास्त्री म्हणाले.

गेली चार वर्षे मी प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे आणि परदेशातील सफाईदार विजयांबद्दल विचाराल तर हा त्यातील सर्वोत्तम आहे.

गोलंदाजीतील चमकदार कामगिरीबद्दल शास्त्री यांनी भारत अरुण यांना श्रेय दिले. अरुण यांनी जी भूमिका निभावली, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. गेली २० वर्षे ते या क्षेत्रात आहेत.

बूमराहचेही कौतुक शास्त्री यांनी केले. त्याची अनुपस्थिती आम्हाला का जाणवत होते, हे त्याच्या कामगिरीवरून लक्षात आले असेल. त्याच्याकडे चमत्कार करून दाखविण्याची कुवत आहे. लोकांना वाटत होते की, तो वनडेचा गोलंदाज आहे. त्यामुळे जेव्हा त्याची दक्षिण आफ्रिकेसाठी निवड झाली, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. पण महिन्याभराच्या विश्रांतीनंतर परतल्यावर त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज