औरंगाबाद : तिरमल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित चौदा वर्षांखालील फुल्ली क्रिकेट करंडक स्पर्धेत नेरळकर अकादमी संघाने विजेतेपद पटाकावले.
अंतिम सामन्यात अविनाश साळवी फाऊंडेशन संघाचा नऊ विकेट्स राखून नेरळकर अकादमीने जेतेपद संपादन केले. अविनाश फाऊंडेशन संघाने ३५.४ षटकात सर्वबाद १३२ धावा काढल्या. त्यात शुभम फलकेने सर्वाधिक ५३ धावा काढल्या. आदिनाथ देशपांडेने २८ धावांत सहा गडी बाद केले. नेरळकर अकादमीने २८व्या षटकात एक बाद १३२ धावा फटकावात जेतेपद मिळवले. आदिनाथ देशपांडेने ६५ धावा फटाकावत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. कल्पेश पटनीने ३१ धावांची खेळी केली.
विजेत्यांना चेतन जाधव यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी अनंत नेरळकर, अजय गायकवाड, श्रीकांत तिरमल, शुभम जगताप, सोहेल पठाण आदी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता.