अ‍ॅपशहर

रमेश पोवारचा कंटाळून राजीनामा

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इनडोअर अकादमीच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी अपेक्षेप्रमाणे काम करण्याची संधीच मिळत नाही आणि केवळ बसून पगार घेणे आपल्याला पसंत नाही, या कारणास्तव भारताचा माजी क्रिकेटपटू आणि फिरकी गोलंदाज रमेश पोवारने राजीनामा दिला....

Maharashtra Times 15 Feb 2018, 12:19 am
एमसीए इनडोअर अकादमीचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपद सोडले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramesh-powar


म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इनडोअर अकादमीच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी अपेक्षेप्रमाणे काम करण्याची संधीच मिळत नाही आणि केवळ बसून पगार घेणे आपल्याला पसंत नाही, या कारणास्तव भारताचा माजी क्रिकेटपटू आणि फिरकी गोलंदाज रमेश पोवारने राजीनामा दिला. आज मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र पाठवून रमेशने आपण या पदावरून पायऊतार होत असल्याचे कळविले आहे.

रमेश पत्रात म्हणतो की, वैयक्तिक कारणांमुळे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इनडोअर अकादमीचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून राजीनामा सादर करत आहे. मला असोसिएशनने तसेच क्रिकेट सुधारणा समितीने जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मुंबई क्रिकेटसाठी यापुढे काहीही करायचे झाल्यास माझे सदैव सहकार्य असेल.

रमेशशी यासंदर्भात म.टा.ने संपर्क साधल्यावर तो म्हणाला की, मी ऑगस्ट २०१७मध्ये या पदाची सूत्रे हाती घेतली. सुरुवातीला मला या पदावर काम करताना फार उत्साह वाटत होता. पण कालांतराने मला काम करण्याची फारशी संधीच मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आठ तास केवळ बसून प्रशिक्षकपदाचे मानधन घेणे मला पटणारे नव्हते.

रमेश म्हणाला की, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. खरे तर, माझ्या मनात ज्या काही योजना होत्या, त्यासाठी गेल्या तीन-चार आठवड्यांचा उत्तम अवधी उपलब्ध होता, पण मला काहीही करण्यास वावच दिला गेला नाही.

मध्यंतरी गोलंदाजी गुणवत्ता शोध मोहिमेत मी सहभागी झालो, त्याचेही मला अधिकृत असे कोणतेही पत्र मिळाले नाही. विविध वयोगटातील मुलांना शिकविण्याची इच्छा होती, पण आवश्यक तेवढ्या संख्येने मुलेच अकादमीत येत नव्हती. या वयोगटातील मुलांची फिरकी गोलंदाजीसाठी निवड करण्याचे काम निवड समितीचे असल्याचे सांगितले गेल्यामुळे माझ्या कामाला आपोआपच मर्यादा पडल्या. आपल्यावर सोपविण्यात आलेल्या कामाचे स्वातंत्र्य नसेल तर काम करण्यात काय हशील ? त्यामुळे या चौकटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

गोलंदाजीच्या गुणवत्ता शोध मोहिमेतूनही मी ६०-७० गोलंदाज निवडले, पण अद्याप त्यांची छाननी, त्यांची पुढील वाटचाल याविषयी काही झालेले नाही. एकूणच चांगले निकाल लागायला हवेत, ही ओरड करून काहीही उपयोग नाही. त्यासाठी पुरेशी तयारी हवी, असेही रमेश नमूद करतो. २३ वर्षांखालील संघाच्या फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतही धडक मारली. त्यात फिरकी गोलंदाजांनीही अपेक्षित कामगिरी केली. मला सोपविण्यात आलेल्या कामाचा पुरेसा उपयोगच होत नसल्याचे मला दिसू लागले होते, असेही रमेशने सांगितले.

भारताचे माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांनी मध्यंतरी हितसंबंधांच्या संघर्षाच्या मुद्यावर कार्यकारिणी सदस्यपदाचा राजीनामा सादर केला होता. त्याआधी, दिनेश नानावटी यांनी अकादमीचे फलंदाजी प्रशिक्षकपद सोडले होते. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा ७ वर्षांचा अनुभव असलेले नानावटी पुन्हा एनसीएत गेले. आता रमेशही जबाबदारीतून मुक्त झाला आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेटमध्ये हे नेमके काय चालले आहे, असा प्रश्न आता क्रिकेटवर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण सभेची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे आणि त्यानंतर निवडणुकीची. एकेक क्रिकेटपटू बाहेर पडत असताना त्यावर उपाययोजना करण्याची ताकद आता असोसिएशनमध्ये राहिलेली नाही का, याचे उत्तर आता अध्यक्ष आशीष शेलार आणि कार्यकारिणीला शोधावे लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज