रवी शास्त्रींनी फेटाळले धोनीच्या निवृत्तीचे वृत्त
दृष्टिक्षेप
१)भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीचे वृत्त म्हणजे निव्वळ अफवाच असल्याचे स्पष्ट केले.
२)'धोनी कुठेच जात नसून तो संघातच आहे. निवृत्तीची फक्त अफवा आहे. जो निव्वळ मूर्खपणा आहे', असे शास्त्री म्हणाले.
३)टीका झाली, तर त्याला कामगिरीतून उत्तर देणे धोनीला खूप छान जमत असल्याचे शास्त्री यांनी सांगितले.
मुंबई : 'धोनीला गोलंदाजांचे प्रशिक्षक भरत अरुणला चेंडू दाखवायचा होता. त्यासाठी त्याने पंचांकडून चेंडू मागून घेतला. चेंडूच्या स्थितीचे निरीक्षण करायचे होते. ज्यावरुन इंग्लंडमधील खेळपट्ट्यांचा, वातावरणाचा अंदाज येतो. त्याच्या निवृत्तीची अफवा ही केवळ मूर्खपणा आहे,' असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले.
भारताने इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका १-२ अशी गमावली. यातील तिसऱ्या वनडेनंतर धोनी पंचांकडून चेंडू घेत असल्याची ३० सेकंदांची क्लिप व्हायरल झाली. धोनीने २०१४मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली होती. अनिर्णित राहिलेल्या त्या कसोटीत धोनीने स्टम्प्स घेतले होते. त्यामुळे या वेळी चेंडू घेतल्याने चाहत्यांनी त्याच्या निवृत्तीचा अंदाज बांधला आणि क्लिप व्हायरल करून सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले. धोनीला या मालिकेत छाप पाडण्यात अपयश आले. त्याच्या संथ फलंदाजीमुळे तो टीकेचा धनीही ठरला होता. मात्र, धोनीने यापूर्वीच २०१९च्या वनडे सामन्यांच्या वर्ल्ड कपपर्यंत संघात राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. विराट कोहलीनेही या मालिकेमध्ये धोनीची पाठराखण केली आहे. आता त्याच्या पाठिंब्यासाठी प्रशिक्षक रवी शास्त्रींन मैदानात उडी घेऊन या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. धोनीच्या निवृत्तीची केवळ अफवा असून, धोनीही कुठेही जाणार नाही, असे शास्त्रींनी सांगितले.