चेस्टर-ली-स्ट्रीट : ड्वेन प्रिटोरियस, ख्रिस मॉरिस, कॅगिसो रबाडा यांची अचूक गोलंदाजी आणि कॅप्टन फाफ डुप्लेसिस, हशिम अमला यांच्या पावणेदोनेश धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेवर नऊ विकेटनी मात केली. उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा हा या वर्ल्ड कपमधील आठ सामन्यांतील दुसराच विजय ठरला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला हरविले होते. दुसरीकडे, श्रीलंकेचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे.
रिव्हरसाइड ग्राउंडवर ही लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव २०३ धावांतच संपुष्टात आला. प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉक १५ धावांवर बाद झाला. मलिंगाने त्याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर कर्णधार डुप्लेस आणि अमला यांनी १९५ चेंडूंत १७५ धावांची अभेद्य भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका - ४९.३ षटकांत सर्वबाद २०३ (कुसल परेरा ३०, अविष्का फर्नांडो ३०, धनंजय डिसिल्वा २४, ड्वेन प्रिटोरियस ३-२५, ख्रिस मॉरिस ३-४६, कॅगिसो रबाडा २-३६, फेहलूक्वायो १-३८, ड्युमिनी १-१५) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका - ३७.२ षटकांत १ बाद २०६ (फाफ डुप्लेसिस नाबाद ९६, हशिम अमला नाबाद ८०).