अ‍ॅपशहर

तमीम इक्बालवर लंडनमध्ये अॅसिड हल्ला?

बांगलादेशचा स्टार सलामीवीर तमीम इक्बाल आणि त्याच्या कुटुंबीयांवर इंग्लंडमध्ये अॅसिडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने अॅसिड अंगावर पडले नसल्याने इक्बाल परिवाराला कोणतीही इजा झालेली नाही.

Maharashtra Times 12 Jul 2017, 9:50 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लंडन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tamim denies hate crime behind sudden essex exit
तमीम इक्बालवर लंडनमध्ये अॅसिड हल्ला?


बांगलादेशचा स्टार सलामीवीर तमीम इक्बाल आणि त्याच्या कुटुंबीयांवर इंग्लंडमध्ये अॅसिडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने अॅसिड अंगावर पडले नसल्याने इक्बाल परिवाराला कोणतीही इजा झालेली नाही. मात्र, या घटनेने हादरलेल्या तमीमने तातडीने कौंटी क्रिकेट सोडून बांगलादेश गाठले आहे. दरम्यान, तमीमने आपल्या फेसबुक पेजवरून अशाप्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही, असा दावा केला आहे.

तमीम इक्बाल कौंटी क्रिकेटमध्ये यंदाच्या मोसमात एसेक्स ईगल्स क्लबकडून खेळत होता. मात्र अॅसिड हल्ल्याच्या घटनेने भेदरलेला तमीम मायदेशी परतला आहे.

बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या डावखुऱ्या तमीमवरील हल्ल्याबाबत बांगलादेशमधील 'डेली स्टार' या दैनिकाने वृत्त दिले आहे. या वृत्तात बांगलादेश क्रिकेट बोर्डातील सूत्रांचा हवाला देण्यात आला आहे. तमीम, त्याची पत्नी आयेशा आणि मुलासह लंडनमधील रेस्टॉरंटमधून घरी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आयेशाने बुरखा घातला होता. हे तिघेही रेस्टॉरंटबाहेर पडताच काही जणांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्या दिशेने अॅसिड फेकले. या हल्ल्यातून तिघेही थोडक्यात बचावले. या घटनेनंतर तमीमने तातडीने कौंटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. एसेक्स ईगल्सकडून तमीम केवळ एकमेव टी-२० सामना खेळला होता. करारानुसार तो ८ सामन्यांत खेळणार होता. मात्र त्याआधीच त्याने एसेक्सला सोडचिठ्ठी दिली, असे वृत्तात नमूद केले आहे.

दरम्यान, एसेक्सनेही तमीम मायदेशी परतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे तमीमने माघार घेतल्याचे एसेक्सचे म्हणणे आहे. दुसरीकडे तमीमनेही अॅसिड हल्ल्याचा इन्कार केला आहे. कौंटी क्रिकेट अर्ध्यावर सोडण्याचे कारण मात्र त्याने सांगितलेले नाही.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज