टोटल कप १७ मेपासून
मुंबई : दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या वतीने १७ मे पासून टोटल कप या १४ वर्षाखालील खेळाडूंच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सामने दोन दिवसांचे
असून मुंबई क्रिकेट संघटनेकडून या स्पर्धेसाठी तीन संघांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेतील चौथा संघ म्हणून विदर्भ क्रिकेट असोसिएशन या संघाला आमंत्रित करण्यात आले आहे. विदर्भ
क्रिकेट संघटनेने हे आमंत्रण स्वीकारले आहे. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि सचिन तेंडुलकर असे तीन संघ एम.सी.ए. निवडणार असून लवकरच या संघाची
घोषणा करण्यात येईल. या स्पर्धेतील कामगिरीवरूनच राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबईच्या १४ वर्षाखालील खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात येत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा संपूर्ण साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील लढती १७-१८ मे, २१-२२ मे आणि २४-२५ मे रोजी खेळविण्यात येणार आहेत.