अ‍ॅपशहर

बॉल टॅम्परिंगचा आरोप ऐकून विराटला हसू फुटलं

राजकोटच्या मैदानात चेंडूशी छेडछाड केल्याचं वृत्त भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनं फेटाळून लावलं आहे. पाच दिवसांपूर्वी या आरोपाबद्दल कळलं तेव्हा मी हसून त्याकडे दुर्लक्ष केलं. असल्या बातम्यांमुळे मला काहीच फरक पडत नाही, असं स्पष्ट करत त्यानं चेंडूप्रमाणेच हा विषयही सीमेपलीकडे उडवून दिला.

Maharashtra Times 25 Nov 2016, 2:25 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मोहाली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat kohli laughs off ball tampering claims
बॉल टॅम्परिंगचा आरोप ऐकून विराटला हसू फुटलं


राजकोटच्या मैदानात चेंडूशी छेडछाड केल्याचं वृत्त भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनं फेटाळून लावलं आहे. मालिकेवरून लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला गेला असावा. पण, पाच दिवसांपूर्वी या आरोपाबद्दल कळलं तेव्हा मी हसून त्याकडे दुर्लक्ष केलं. असल्या बातम्यांमुळे मला काहीच फरक पडत नाही, असं स्पष्ट करत त्यानं चेंडूप्रमाणेच हा विषयही सीमेपलीकडे उडवून दिला.

विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियानं इंग्लंडचा दारूण पराभव केल्यानं ब्रिटिश मिडियाचा तीळपापड झाला आहे. काहीतरी खुसपट काढायचं म्हणून इंग्लंडमधील एका वृत्तपत्रानं विराट कोहलीवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. राजकोट कसोटीत क्षेत्ररक्षणादरम्यान च्युइंगगम खात असताना विराटनं त्याची थुंकी चेंडूला लावून चेंडू चमकवण्याचा प्रयत्न केला, असा दावा 'डेली मेल'नं केला होता. परंतु, इंग्लंड संघाने विराटवर कोणताही आरोप केला नसल्यानं आयसीसीनं या आरोपाला अजिबात महत्त्व न देता विराटला 'क्लीन चिट' दिली होती.

या पार्श्वभूमीवर, आज झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीनं बॉल टॅम्परिंगच्या आरोपाचा आपल्या शैलीत समाचार घेतला. आयसीसीच्या निर्णयापुढे वृत्तपत्रातील बातम्यांना माझ्या लेखी किंमत नाही, अशी चपराक त्यानं ब्रिटिश वृत्तपत्राला लगावली. मी वृत्तपत्र वाचत नाही, पण मला जेव्हा या आरोपांबद्दल कळलं तेव्हा मला हसूच आलं, असा टोलाही त्यानं लगावला. शनिवारपासून सुरू होणाऱ्या मोहाली कसोटीसाठी आपण सज्ज आहोत, असंही त्यानं ठामपणे सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज