अ‍ॅपशहर

'कोहलीच्या कर्णधारपदाची पारख व्हायचीय'

'टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडं यशस्वी कर्णधार होण्याचे सर्व गुण आहेत. मात्र, अजून त्याच्या नेतृत्वगुणांची खरी पारख व्हायची आहे,' असं परखड मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं व्यक्त केलं आहे.

Maharashtra Times 14 Feb 2017, 3:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat kohli still to be tested as a captain remarks sourav ganguly
'कोहलीच्या कर्णधारपदाची पारख व्हायचीय'


'टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडं यशस्वी कर्णधार होण्याचे सर्व गुण आहेत. मात्र, अजून त्याच्या नेतृत्वगुणांची खरी पारख व्हायची आहे,' असं परखड मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं व्यक्त केलं आहे.

कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने सोमवारी बांगलादेशाला २०८ धावांनी पराभूत केले. त्या पार्श्वभूमीवर एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना सौरवनं हे मत व्यक्त केलं. मायभूमीत झालेल्या लढतींमध्ये भारतीय संघानं नेहमीच चांगली कामगिरी बजावली आहे. असंच यश परदेशातही कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला मिळेल, अशी आशा त्यानं व्यक्त केली.

तो म्हणाला, 'कोहलीमध्ये जिंकण्याची ऊर्मी आहे. त्याला जिंकण्याचं वेड आहे. श्रीलंकेतही त्यानं चांगली कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजचा संघ कमकुवत होता असं तुम्ही म्हणालही. पण त्यांच्या विरोधातही कोहलीच्या संघानं नेत्रदीपक विजय मिळविला. हे सगळं असलं तरी अजून त्याची पारख व्हायची बाकी आहे.'

'कोहली आपल्याला सर्वांना आवडतो. तो भारतीय संघाला यशोशिखरावर घेऊन जाईल यात शंका नाही. पण त्याची परीक्षा अजून व्हायची बाकी आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत त्याच्या कर्णधारपदाचा खऱ्या अर्थानं कस लागेल,' असंही गांगुली म्हणाला.

सर्वश्रेष्ठ कर्णधार म्हणण्याची घाई नको!

मायभूमीत कोहलीच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. पण तरीही त्याला सर्वश्रेष्ठ कर्णधार म्हणणं अतिघाईचं होईल. अझरुद्दीन, धोनी, मी आणि राहुल द्रविड आम्ही चौघेही मायभूमीत खूपच कमी सामन्यात पराभूत झालो आहोत. पण परदेशात परिस्थिती वेगळी असते. भारताचे फिरकी गोलंदाज जोपर्यंत नवीन डावपेच आखत नाहीत तोपर्यंत हे असंच होणार. त्यामुळे कोहलीबाबत काही बोलण्यापूर्वी हा मागचा रेकॉर्डही तपासायला हवा,' असेही तो म्हणाला.

२३ फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना रंगणार आहे. त्यावर बोलताना गांगुली म्हणाला की, ऑस्ट्रेलिया संघ हा वेगळ्याच प्रकारचा संघ असून त्यांचा खेळही वेगळ्या धाटणीचा आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज