अ‍ॅपशहर

उरुग्वेची सौदीला ‘किक’

पहिल्या सामन्यात इजिप्तवर अखेरच्या मिनिटांमध्ये विजय मिळविल्यानंतर, तुलनेने दुबळ्या सौदी अरेबियावर सफाईदार विजय मिळविण्यासाठी मैदानावर उतरलेल्या उरुग्वेला बुधवारी १-० असाच विजय नोंदवता आला.

Maharashtra Times 21 Jun 2018, 4:00 am
वृत्तसंस्था, रोस्तोव अरिना (रशिया)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम urugwe


पहिल्या सामन्यात इजिप्तवर अखेरच्या मिनिटांमध्ये विजय मिळविल्यानंतर, तुलनेने दुबळ्या सौदी अरेबियावर सफाईदार विजय मिळविण्यासाठी मैदानावर उतरलेल्या उरुग्वेला बुधवारी १-० असाच विजय नोंदवता आला. या विजयासह फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ग्रुप ए'मधून उप-उपांत्यपूर्व फेरीसाठी रशियासह उरुग्वेचे स्थान निश्चित झाले आहे.

'ग्रुप ए'मधून रशियाने दोन्ही सामने जिंकत उप-उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे, उरुग्वेसाठी सौदी अरेबियाविरुद्धचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. उरुग्वेचा स्टार लुईस लुईस सुआरेझचा १००वा सामना होता. त्यामुळे, त्याच्यासाठीही हा सामना संस्मरणीय करण्याचा त्यांचा विचार होता. मागील सामन्याप्रमाणे याही सामन्यात उरुग्वेने ४-४-२ अशीच खेळाडूंची रचना कायम ठेवली. सामना सुरू झाल्यानंतर पाचव्याच मिनिटांमध्ये सौदी अरेबियाने आक्रमण केले. दोन्ही संघांकडून आक्रमण-प्रतिआक्रमण रचण्याचे प्रयत्न झाले. अखेरीस २३व्या मिनिटांनी कॉर्नरवरून सांचेजने मारलेल्या किकवर चेंडूला गोलची दिशा देण्यात सुआरेझ यशस्वी ठरला आणि उरुग्वेने १-० अशी आघाडी घेतली. सुआरेझचा हा ५२वा आंतरराष्ट्रीय गोल होता. त्यानंतर दोन्ही संघांनी परस्परांविरोधात चाली रचल्या, पूर्वार्धामध्ये गोलफरक १-० असाच कायम राहिला.

उत्तरार्धामध्येही दोन्ही संघांकडून आक्रमक चाली रचण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, परस्परांचा बचाव भेदत खोलवर चढाई करण्यामध्ये सातत्याने अपयश आले.

उरुग्वने ५९व्या मिनिटांनी रोड्रिग्ज आणि वेसिनो यांच्या जागी दिएगो लक्झाल्ट आणि लुकास टोरेइरा यांना मैदानात उतरवले. या ताज्या दमाच्या मधल्या फळीतील आक्रमकांसह काही चाली रचत उरुग्वेच्या खेळाडूंनी चेंडू सौदी अरेबियाच्या भागात ठेवण्यात यश मिळविले होते. उरुग्वेचा कॅव्हिनीने ६२ आणि ८०व्या मिनिटांनी गोल करण्याची संधी निर्माण केल्या होत्या. मात्र, त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरले. अखेरच्या पाच मिनिटांमध्ये सौदी अरेबियाकडून वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न झाला, त्यावर उरुग्वेने प्रतिआक्रमण रचले. कॅव्हिनीने सौदी अरेबियाच्या दोन बचावपटूंना चकवत चेंडू सौदी अरेबियाच्या जाळ्याजवळ नेलाही होता. मात्र, अल ओवेसने त्याच्याकडून चेंडू हिरावला.

आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये उरुग्वे १४व्या, तर सौदी अरेबिया ६७व्या स्थानावर आहे. रशियाने पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये सफाईदार विजय नोंदवले आहेत. तर, उरुग्वेचा गोलफरक फारच कमी आहे. त्यामुळे, गटात अव्वल स्थान मिळवण्यासाठी उरुग्वेला रशियाविरुद्धच्या सामन्यामध्ये विजय अनिवार्य आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज