इंग्लंडवर मात करून प्रथमच अंतिम फेरीत दाखल
वृत्तसंस्था, मॉस्को
मारिओ मँझुकिचने 'एक्स्ट्रा टाइम'मध्ये नोंदविलेल्या गोलच्या जोरावर क्रोएशियाने इंग्लंडवर २-१ ने मात केली आणि फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. क्रोएशियाने वर्ल्ड कपची प्रथमच अंतिम फेरी गाठली असून, आता रविवारी त्यांची विजेतेपदासाठी माजी विजेत्या फ्रान्सशी लढत होईल.
जागतिक क्रमवारीत इंग्लंड बाराव्या, तर क्रोएशिया २०व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, हे संघ सात वेळा आमनेसामने आले होते. त्यात चार वेळा इंग्लंडने, तर दोनदा क्रोएशियाने बाजी मारली होती. तसेच, एक लढत ड्रॉ झाली होती. क्रोएशिया संघ प्रथमच 'वर्ल्ड कप'ची अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्सुक होता, तर दुसरीकडे माजी विजेता इंग्लंड संघ दुसऱ्यांदा 'वर्ल्ड कप'ची अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज होता. इंग्लंडने धडाक्यात सुरुवात केली. मॉड्रीचने इंग्लंडच्या डेली अलीला पाडले आणि इंग्लंडला फ्री किक मिळाली. या संधीचे किएरन ट्रिपिएरने सोने केले. पाचव्याच मिनिटाला ट्रिपियरने गोल नोंदवून इंग्लंडचे खाते उघडले. त्यानंतरही इंग्लंडने आघाडी वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले, तर दुसरीकडे क्रोएशियाने बरोबरीसाठी प्रयत्न केले. मात्र, मध्यंतरापर्यंत इंग्लंडने १-० अशी आघाडी कायम राखली.
उत्तरार्धात क्रोएशियाच्या खेळाडूंनी बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. अखेरीस ६८व्या मिनिटाला सिमे वरसाल्कोच्या क्रॉस पासवर इव्हान पेरीसिचने जबरदस्त गोल नोंदवून क्रोएशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्या वेळी क्रोएशियाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्यापाठोपाठ तीनच मिनिटांनी पेरीसिचने आणखी एक जबरदस्त प्रयत्न केला होता. मात्र, चेंडू गोलपोस्टच्या पोलला लागून परतला. आघाडी मिळविण्यासाठी दोन्ही संघांनी कसोशीने प्रयत्न केले. भरपाई वेळेत इंग्लंडला आणखी एक फ्री किक मिळाली होती. मात्र, या वेळी ट्रिपियरला संधी साधता आली नाही. अखेरीस निर्धारित वेळ बरोबरीत सुटली.
अतिरिक्त वेळेत इंग्लंडला कॉर्नर मिळाला होता. त्यावर इंग्लंडच्या स्टोन्सने हेडरद्वारे गोल करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला होता. मात्र, तितक्याच सुरेखरित्या सिमेने चेंडू परतविला आणि क्रोएशियाला तारले. अतिरिक्त वेळेतील पहिल्या १५ मिनिटांचा खेळ संपत आला असतानाच मँडझुकिचने सुरेख प्रयत्न केला होता. मात्र, गोल झाला नाही. त्यानंतर १०९व्या मिनिटाला मँडझुकिचनेच मिळालेल्या संधीचे सोने करून गोल नोंदविला आणि क्रोएशियाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्या वेळी क्रोएशियाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत क्रोएशियाने विजयावर शिक्कामोर्तब केले.
...
दृष्टिक्षेप...
- इंग्लंडला मागील पाच पैकी चार मोठ्या स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीतून गाशा गुंडाळावा लागला आहे.
- यात युरो १९६८ स्पर्धेत युगोस्लावियाकडून, १९९०मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत पश्चिम जर्मनीकडून, १९९६च्या युरो कपमध्ये जर्मनीकडून आणि आता २०१८च्या वर्ल्ड कप स्पर्धेत क्रोएशियाकडून इंग्लंड संघ पराभूत झाला.
- डेव्हिड बॅकहॅमनंतर (२००६) वर्ल्ड कपमध्ये फ्री-किकवर थेट गोल करणारा ट्रिपिएर हा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला.
- क्रोएशियाच्या पेरीसिचने मोठ्या स्पर्धांमध्ये १० गोलमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. यात त्याने सहा गोल केले असून, चार गोलना सहाय्य केले आहे.
- क्रोएशिया हा वर्ल्ड कपमधील सलग तीन लढती 'एक्स्ट्रा टाइम'मध्ये खेळणारा इंग्लंडनंतरचा (१९९०) पहिलाच संघ ठरला.
- २००० सालानंतर इंग्लंड क्रोएशियाकडून तीन स्पर्धात्मक लढतींत पराभूत झाला.
- मँडझूकिचने गेलेला विजयी गोल हा इंग्लंडने या वर्ल्ड कपमध्ये स्वीकारलेला सर्वांत उशीराचा (१०८ मि. ३ से.) गोल ठरला.
....
१ - क्रोएशियाचा संघ वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला. युगोस्लाव्हियापासून स्वतंत्र झाल्यानंतर क्रोएशिया पाचव्यांदा वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला होता.
९ या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने नऊ गोल हे 'सेट-पीस'मध्ये केले होते. अशा पद्धतीने एका वर्ल्ड कपमध्ये एवढे गोल करणारा १९६६नंतर इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.
४ इंग्लंडच्या ट्रिपिएरने ४ मिनिटे ४४ सेकंदांत गोल केला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत १९५८नंतरचा हा वेगवान गोल ठरला. १९५८च्या वर्ल्ड कपमध्ये ब्राझील वि. फ्रान्स लढतीत व्हावाने २ मिनिटांत गोल केला होता.
...
क्रोएशिया वि. इंग्लंड
२ गोल १
२२ शॉट्स ११
७ ऑन टार्गेट १
११ ऑफ टार्गेट ६
४ ब्लॉक ४
८ कॉर्नर ४
१ ऑफसाइड ३
५४% चेंडूवरील ताबा ४६%
४९९ पासेस कम्पिटेड ३७७
२ यलो कार्ड १
२३ फाउल १४
...