अ‍ॅपशहर

माजी कर्णधाराने उभी केली २२ लाखांची मदत

करोनाच्या काळात हॉकीतील खेळाडू, प्रशिक्षक आणि मैदानातील कर्मचाऱ्यांना सोसावी लागलेली आर्थिक चणचण लक्षात घेता भारताचा माजी हॉकी कर्णधार ...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2020, 11:16 am
नवी दिल्लीः करोनाच्या काळात हॉकीतील खेळाडू, प्रशिक्षक आणि मैदानातील कर्मचाऱ्यांना सोसावी लागलेली आर्थिक चणचण लक्षात घेता भारताचा माजी हॉकी कर्णधार वीरेन रस्किन्हाने २२ लाख रुपये गोळा केले असून त्यातून अशा गरजवंतांना मदत केली जाणार आहे. रस्किन्हाने ही मदत ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट आणि गो स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या मदतीने उभारली आहे. रस्किन्हा ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचा संचालक आहे. 'चलो मिलकर रहे' या योजनेतून त्याने ही मदत उभारली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Viren-Rasquinha


रस्किन्हाने केलेल्या आवाहनाला १२० जणांनी प्रतिसाद दिला आणि मदत केली. त्यात माजी हॉकीपटू, इतर खेळातील खेळाडू व उद्योग जगतातील दात्यांचा समावेश होता. ज्यांना मदत द्यायची आहे, अशा २२० जणांची यादी आता तयार करण्यात आली आहे. करोनाच्या काळात या गरजवंतांना मदतीची नितांत आवश्यकता आहे. या सर्वांना प्रत्येकी १० हजार रुपये दिले जाणार आहेत.

रस्किन्हाने यासंदर्भात सांगितले की, 'माजी खेळाडू आणि माझे पूर्वीचे सहकारी तसेच रिपब्लिकन स्पोर्टस क्लबचे प्रशिक्षक कॉनरॉय रेमेडियोस आणि त्यांची पत्नी व माजी हॉकी गोलरक्षक दीपिका मूर्ती यांच्याशी बोलल्यानंतर अनेकांना अशी आर्थिक चणचण जाणवत असल्याचे दिसून आले. करोनाच्या लॉकडाउनच्या काळात सगळे मार्ग बंद झाल्यामुळे या गरजवंतांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. त्यांच्या उत्पन्नाचे मार्गही बंद झाले आहेत. हे सगळे लोक गरीब परिवारातील आहेत. अनेक खेळाडूंचे पालक हे छोटीमोठी कामे करून उपजीविका करत आहेत. त्यांना या लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मी त्यांना छोटी का होईना मदत करण्याचे ठरविले.'

ही जाणीव झाल्यावर रस्किन्हाने गो स्पोर्टस फाऊंडेशनचे विश्वस्त आणि आपले मित्र नंदन कामथ यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मदतीचे काम हाती घेतले. रस्किन्हा म्हणतो की, 'तळागाळातील खेळ जतन करण्यासाठी या लोकांना मदत मिळणे आवश्यक होते. कारण त्यांच्याशिवाय खेळाचा हा स्तर जिवंत राहू शकत नाही. मी ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टसमोर हे म्हणणे मांडले आणि त्यांनी गो स्पोर्टस फाऊंडेशनसह मदतीचा हात देण्याची तयारी दर्शविली.'

ही मदत नेमकी कुणाला द्यायची हा प्रश्न होताच. मग आपल्या खेळातील माजी खेळाडूंशी संपर्क साधून अशा गरजवंतांची नावे मागविली. रेमेडियोस, अरुमुगम, दिलीप तिर्की, भरत चिकारा, विक्रम पिल्ले, व्हीएस विनय यांच्याशी संपर्क साधून कुणाला मदत करता येईल, याची विचारणा केली. जे २०-२५ वर्षे हॉकीशी जोडलेले आहेत, त्यांच्याकडूनच ही माहिती घेतली. त्यामुळे खरे गरजवंत निश्चित करता आले, असे रस्किन्हा म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज