म.टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर
नागपूर जिल्हा टेबलटेनिस संघटनेतर्फे आणि शक्ती क्लबच्या सहकार्याने आयोजित खुल्या मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ज्युनिअर मुलींच्या गटात अनन्या सकलकळे तर मुलांच्या गटात जयेश कुळकर्णी यांनी विजेतेपद पटकावले.
वर्धा मार्गावरील शक्ती क्लब येथे आयोजित ज्युनिअर मुलींच्या गटातील अंतिम फेरीत अनन्या साकळकळे हिने प्रतिस्पर्धी इशा अंभैकरला ११-४, ९-११, ११-९, ११-६, ११-४ अशा गुणांनी नमवत स्पर्धेतील जेतेपद प्राप्त केले. मुलांच्या गटात जयेश कुळकर्णीने त्याचा प्रतिस्पर्धी आदित्य हिरुळकरला ११-१, ११-३, ११-३, ८-११, ११-३ असे चार सेटसमध्ये पराभूत करत विजेतेपद पटकावले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना नागपूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष दीपक धोटे यांच्या हस्ते सचिव आशुतोष पोतनीस, विजय नाईक, यश धोटे, दीपक कानिटकर यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.