म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित विभागीय आंतर शालेय नेटबॉल स्पर्धेत सम्यक पब्लिक स्कूल संघाने विजेतेपद पटाकावले.
जालना येथे विभागीय शालेय नेटबॉल स्पर्धा झाली. या स्पर्धेत औरंगाबादसह जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. सम्यक पब्लिक स्कूल संघाने सलग दुसऱ्यावर्षी विजेतेपद पटाकावले. विजेत्या संघात भारती मघाडे (कर्णधार), प्राची पासवान (उपकर्णधार), प्रतीक्षा जाधव, युक्ता कांबळे, राष्ट्रपाली वाकळे, तेजस्विनी भोले, अनुष्का सातदिवे, प्राची पगारे, साधना बनसोडे, गंगा दाभाडे, भक्ती गिरी, तन्वी काकडे यांचा समावेश आहे. या संघास सतीश इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला प्रधान, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, लता लोंढे, रमेश प्रधान, सविता शिंदे, मुख्याध्यापक सचिन गवळी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या जेतेपदामुळे सम्यक पब्लिक स्कूलचा संघ राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.