सीनिअर डिव्हिजन हॉकी स्पर्धा
म. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर
विदर्भ हॉकी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या सीनिअर डिव्हिजन हॉकी लीग स्पर्धेत कॉसमॉस स्पोर्टस क्लबने स्पर्धेतील विजयी मोहीम कायम ठेवत विमल स्पोर्टिंग क्लबला ३-१ अशा फरकाने पराभूत केले. संघाच्या विजयात तेजस वरघटने दोन गोल करत महत्त्वाची भूमिका बजावली. विदर्भ हॉकी संघटनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
अमरावती मार्गावरील व्हीएचए मैदानावर सोमवारी झालेल्या लढतीत आघाडीसाठी उभय संघांनी आक्रमक खेळाने सामना सुरू केला. परंतु, १५ मिनिटापर्यंत कोणालाही गोल करण्यात यश आले नाही. १६ व्या मिनिटाला कॉसमॉस क्लबने नियमबाह्य पद्धतीने संरक्षण केले. त्यामुळे मिळालेल्या पेनॉल्टी कॉर्नरवर सॅव्हियो फ्रान्सीसने गोल करून विमल क्लबला १-० अशी आघाडी मिळून दिली. कॉसमॉसच्या खेळाडूंना मध्यंतरापर्यंत बरोबरी साधन्यात यश आले नाही. मध्यंतरानंतर ४० व्या मिनिटाला प्रफुल्ल लोहंगरेने गोल करण्याची संधी गमाविली नाही आणि कॉसमॉस क्लबने १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर उभय संघ आघाडी घेण्याच्या उद्देशाने आक्रमणाची गती वाढविली. अशातच कॉसमॉस क्लबच्या तेजस वरघटने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत ५१ व ५९ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी नव्हे तर विजय मिळवून दिला. स्पर्धेत मंगळवारी दोन सामने होणार असून पहिली लढत मॉर्निंग स्टार-नागपूर हॉकी अकादमी आणि दुसरी लढत शक्ती स्पोर्टिंग क्लब-नागपूर जिमखाना संघात होणार आहे.