म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सावली फाऊंडेशन व औरंगाबाद जिल्हा खोखो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दोन व तीन ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय शालेय खोखो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगपुरा भागातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय शालेय खोखो स्पर्धा दोन दिवस रंगणार आहे. ही स्पर्धा मुला-मुलींच्या गटात होईल. दोन्ही गटांतील प्रथम, द्वितीय संघांसह उत्कृष्ट खेळाडू, सरंक्षक, आक्रमक खेळाडूंना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी संघांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल बडदाळे, अनुप्रिया बुक सेंटर, दीपक सपकाळ, स्वामी विवेकानंद अॅकॅडमी या ठिकाणी नावे नोंदवावीत, असे आवाहन सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल बडदाळे, सचिव प्रियांका शेटे, जिल्हा खोखो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, सचिव गोविंद शर्मा, स्पर्धा प्रमुख शिवाजी खांड्रे यांनी केले आहे.